माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यामधील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण झाली आहे. आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात होते. जितेंद्र आव्हाड यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, मात्र पूर्वकाळजी म्हणून  सध्या ते कुटुंबासोत होम क्वारंटाइन आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कातील जवळपास १५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये पाच पोलीस कर्मचारी, घऱातील कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आनंद परांजपे यांना लागण झाल्याचं स्पष्ट झालं असल्याने ही संख्या १६ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी अधिकाऱ्यासोबत कायदा सुव्यवस्थेसंबंधी चर्चा केली होती. पण गेल्याच आठवड्यात या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. या पोलीस अधिकाऱ्यावर मुंब्रा येथील तबलिगी जमाच्या सदस्यांची ओळख पटवण्याची जबाबदारी होती. अधिकाऱ्याने १३ बांगलादेशी आणि आठ मलेशियाचे अशा एकूण २१ जणांना नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.

आणखी वाचा- मला माफ करा… मी हरलो.. : जितेंद्र आव्हाड

तबलिगी जमातच्या सदस्यांना क्वारंटाइन ठेवण्यात आलं होतं. पण प्राथमिक चाचणीत सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण नेमकी झाली कशी हे स्पष्ट झालेलं नाही. मुंब्रा येथील रहिवाशांपासून पोलीस अधिकाऱ्याला लागण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलीस अधिकाऱ्याला लागण झाल्याचं समोर येताच ठाणे महापालिकेकडून संपर्कात आलेल्या १०० जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये जितेंद्र आव्हाड, पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि काही इतरांचा समावेश होता.

आणखी वाचा- “जितेंद्र कसा आहेस.. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना?”; शरद पवारांचा आव्हाडांना फोन

प्राथमिक रिपोर्टमध्ये ठाण्यातील दोन पत्रकार, मुंब्रा पोलीस ठाण्याचे तीन पोलीस कर्मचारी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यशी संबंधित १४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान आनंद परांजपे यांच्या कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे.