15 July 2020

News Flash

धर्मगुरूच्या वाढदिवसामुळे भक्तांना करोनाबाधा

धर्मगुरूने आपला वाढदिवस साजरा करून करोना संसर्गाला खतपाणी घातल्याचे समोर आले आहे

उल्हासनगर : करोनाशी संबंधित टाळेबंदीमुळे राज्यातील धार्मिक समारंभ, सोहळय़ांवर बंदी असतानाही उल्हासनगरातील एका दरबारमधील धर्मगुरूने आपला वाढदिवस साजरा करून करोना संसर्गाला खतपाणी घातल्याचे समोर आले आहे. संबंधित धर्मगुरू कुटुंबीयांसह खासगी रुग्णालयात करोनावर उपचार घेत असून आतापर्यंत १३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांवर हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरातील कॅम्प पाच भागातील एका दरबारामध्ये १७ मे रोजी मध्यरात्री पार पडलेल्या या वाढदिवसाच्या समारंभामध्ये महाराष्ट्रातील करोनाचे केंद्र ठरलेल्या पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ातून काही अनुयायी आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच गुजरातमधल्या अहमदाबाद या सर्वाधिक धोकादायक शहरातूनही काही अनुयायी या वाढदिवसासाठी उल्हासनगराच्या या दरबारात आल्याचीही माहिती आता समोर येते आहे. या वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर या धर्मगुरूला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. या सर्व कुटुंबीयांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांसह काही अनुयायी करोनाच्या विळख्यात सापडले असून त्यातील ८ जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली आहे. काहींना दरबारच्याच दुसऱ्या मजल्यावर तर काहींना डॉल्फीन क्लब येथे विलगीकरणात ठेवल्याचेही भदाणे यांनी सांगितले.

हा प्रकार धक्कादायक असून या कार्यक्रमात कोण उपस्थित होते याची माहिती घेतली जाते आहे. आतापर्यंत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दरबारमधील सीसीटीव्हीचे चित्रण मिळवण्याचा प्रयत्नही सुरू आहे.

-प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 2:25 am

Web Title: coronavirus to devotees due to dharmaguru birthday zws 70
Next Stories
1 राष्ट्रगीताने करोना रुग्णांना निरोप
2 बारवी धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडलेलेच
3 बदलापूर करोना केंद्रात गैरसोयी कायम
Just Now!
X