महापालिकेकडे पहिल्याच दिवशी तीन हजार जणांची नोदणी

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात वसई-विरार महानगरपालिका परिसरात पहिल्याच दिवशी ४५० जणांनी लस घेतली.  यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. लसीकरणासाठी पालिकेकडे तीन हजारहून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. दरम्यान पालघर जिल्ह्य़ात लसीकरण करण्यासाठी ११ शासकीय  केंद्रांसह चार खासगी रुग्णालयांमधून लसीकरणास सुरूवात झाली आहे.

सोमवारी सकाळपासूनच पालिका केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली होती. सकाळपासून दोन वेळा सव्‍‌र्हरमध्ये बिघाड झाल्याने लसीकारणाला वेळ लागला होता.पण दुपारनंतर सर्व सुरळीत झाल्याने पुन्हा गती प्राप्त झाली.

पालघर जिल्ह्यत ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अशा अकरा ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयासह प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा तसेच महात्मा फुले जन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या पालघर जिल्ह्यतील जनसेवा रुग्णालय (वसई), विजयलक्ष्मी  (नालासोपारा), आस्था  (मनोर) व साई नीट रुग्णालय (बोईसर) या चार ठिकाणी सशुल्क लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व केंद्रातील कर्मचाऱ्यांना सोमवारी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले. पालघर जिल्ह्यत अन्य पाच रुग्णालयांमध्ये सशुल्क करोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी करण्यात आलेले अर्ज हे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यतील ९ खासगी रुग्णालयात सशुल्क लस उपलब्ध होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

जिल्ह्यत ८८ करोना रुग्ण

पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात उपचारार्थ ८८ करोना रुग्ण असून त्यापैकी ७१ रुग्ण पालघर तालुक्यात आहेत.  डहाणू तालुक्यात १५ व वाडा तालुक्यात दोन रुग्ण उपचार घेत आहेत. जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई ग्रामीण व विक्रमगड तालुक्यांत सद्य:स्थितीत करोनाचा एकही रुग्ण नाही, असे शासकीय अहवालावरून दिसून येते. ग्रामीण भागात करोनामुळे आतापर्यंत ३०६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ग्रामीण भागात १५ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.  हे सर्व रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत.

पालघर जिल्ह्य़ात दोन टप्प्यांत २५ हजार कर्मचाऱ्यांना लस

करोना लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत २५ हजार आरोग्य कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांचे  लसीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यापैकीच सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांनी याअंतर्गत दुसरा डोस देण्यात आले आहेत.

वसई-विरारमध्ये १५,५४८

पालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात १५ हजार ५४८  लाभार्थ्यांची नोंदणी केली. त्यात १२ हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

वसईत नवीन २२ रुग्ण; २८ करोनामुक्त

लोकसत्ता वार्ताहर

वसई :  वसईत सोमवारी २२  नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर आज दिवसभरात २८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.  वसई विरार महापालिकेच्या हद्दीत सोमवारी २२ नवीन  करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

यामध्ये १३ पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३० हजार ३७८ एवढी झाली आहे. तसेच आज २८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्त रुग्णांची संख्या  २९ हजार ११६  वर गेली आहे. अजूनही ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.