वसई, विरारमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेची सज्जता

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लस मिळावी यासाठी वसई-विरार महापालिकेने दहा आरोग्य केंद्रांत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे केंद्र शासनाच्या आरोग्य योजना असलेल्या वसईतील दोन खासगी रुग्णालयांत लसीकरणाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या रुग्णालयात २५० रुपये भरून लस देण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेला लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला वसईत सोमवार १ मार्चपासून सुरुवात झाली. पालिकेच्या वसई पूर्वेच्या वालीव येथील वरुण इंडस्ट्रीमध्ये असलेल्या केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात ७ टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. म्हणजे शहरातील ४ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वाना वालीवच्या वरुण इंडस्ट्रीजमध्ये येणे गैरसोयीचे ठरत आहे. यासाठी पालिकेने त्यांच्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडे १९ आरोग्य केंद्रे आहेत. ज्या ठिकाणी पुरेशी जागा आहे, सोयीसुविधा आहेत अशा केंद्रांत आधी लस दिली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने १० केंद्रे निश्चित केली आहेत.  या आठवडय़ापासूनच तिथे लसीकरणाची सोय करून दिली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली.

खासगी रुग्णालयात आयुष्यमान भारत, पंतप्रधान जनआरोग्य योजना, केंद्र सरकारी आरोग्य योजना, राज्य आरोग्य विमा योजना सुरू आहेत अशा रुग्णालयांत लसीकरणाला परवानगी दिली आहे. नालासोपारामधील विजयलक्ष्मी आणि वसईतील जनसेवा रुग्णालयात तसेच मनोर येथील आस्था आणि बोईसर येथील साईनित रुग्णालयातदेखील ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

थेट केंद्रावर लस

लस घेण्यासाठी आधी नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागत होती. मात्र त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. अनेकांना नोंदणी केल्यावर ओटीपी येत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी थेट केंद्रावर गेल्यावरदेखील लस दिली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले. त्यासाठी ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. वसई विरार महापालिकेकडे सध्या सात हजार लसींचा साठा आहे. टप्प्याटप्प्याने लसी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

एका दिवसात ५४६ जणांचे लसीकरण

लसीकरणाच्या तिसर्?या टप्प्यात वसई विरार मध्ये ५४६ जणांना लस देण्यात आली. पालिकेच्या वरूण इंडस्ट्री येथील केंद्रात बुधवारी १४०० जणांना लस देण्यात आली. त्यातील ४०० जण हे ज्येष्ठ नागरिक होते अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी दिली. तर खासगी रुग्णालयांपैकी जनसेवा रुग्णालयात १०१ आणि नालाोसपारा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात ४५ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ दिपिका झा यांनी दिली.

शहरात ४ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. सर्वाना लस मिळणे सोयीचे व्हावे, यासाठी आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. पालिकेकडे लसींचा पुरेसा साठा आहे.

– गंगाथरन डी. , आयुक्त, वसई-विरार महापालिका

पालघरमध्ये  आणि वसईतील प्रत्येकी दोन  खासगी रुग्णालयांना लसींची परवानगी देण्यात आली आहे.  नोंदणी करण्यात अडचणी येत असल्यास थेट रुग्णालयातही लस दिली जाईल.

– डॉ. दीपिका झा, पालघर जिल्हा समन्वयक, जन आरोग्य योजना