संकेतस्थळ कोलमडल्याने लसीकरण प्रक्रियेत गोंधळ; जिल्हा रुग्णालयात मात्र प्रतिसाद

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे/ कल्याण/ बदलापूर : करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असताना अंमलबजावणीतील गोंधळ आणि संभ्रमामुळे सोमवारी ठाणे जिल्ह्य़ात लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या पदरी निराशा पडली. या टप्प्यात ४५ ते ६० वर्षांपर्यंत सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. मात्र कोविन-२ या संकेतस्थळावर नोंदणी होण्यात येत असलेल्या अडचणी, महापालिकांसह खासगी रुग्णालयांमधील व्यवस्थापनांना अंमलबजावणीबाबत नसलेली स्पष्टता यामुळे अनेकांना लसीकरणाविनाच घरी परतावे लागले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमधील शासकीय रुग्णालयांमध्येही मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्चपासून सुरू करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. शासकीय लसीकरण केंद्राबरोबरच खासगी रुग्णालयांमधील केंद्रावर ही लस दिली जाणार आहे.  ठाणे जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे सकाळपासूनच या रुग्णालयांभोवती इच्छुकांची गर्दी होऊ लागली होती. प्रत्यक्षात या ठिकाणी लसीकरणाचे डोसच उपलब्ध नव्हते. या रुग्णालयांना लसीचे डोस कुठून आणि कसे मिळणार याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे संबंधित रुग्णालय प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. त्याचा फटका संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना बसला. काही नागरिकांनी लसीकरणासाठी संकेतस्थळावर नोंदणी केली आणि ते संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये गेले. मात्र तिथे लसीचे डोस उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. हे चित्र ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांसह ग्रामीण भागांत दिसून आले.

उल्हासनगरात शाळा क्रमांक २८ आणि अभियांत्रिकी विद्यालयात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. त्याच ठिकाणी सर्वसामान्यांसाठी प्रतिदिन २०० लसींचे डोस उपलब्ध केले होते. मात्र सोमवारी सकाळपासून तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठीचे संकेतस्थळ ठप्प झाले होते. अर्जच भरला जात नसल्याने दुपापर्यंत कुणालाच लस देता आली नाही. या वृत्तास उल्हासनगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दुजोरा दिला. अंबरनाथमध्ये डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात लस देण्यात येत होती. मात्र येथेही यंत्रणेतील घोळामुळे दुपापर्यंत एकही लस दिली गेली नाही. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या कै. दुबे रुग्णालयात लसीकरण सुरू होते. मात्र येथेही नागरिकांचा हिरमोड झाला.या तिन्ही शहरांमध्ये नोंदणी झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील लसीकरण मात्र सुरळीतपणे सुरू होते.

ठाण्यात १५ ठिकाणी लसीकरण केंद्रे

ठाणे महापालिका क्षेत्रात ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवक, विविध व्याधीग्रस्त नागरिक आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही, असे आरोग्य कर्मचारी या सर्वासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील १५ ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून सकाळी १२ ते संध्याकाळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत.

लसीकरण केंद्र कुठे?

दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, ग्लोबल कोविड रुग्णालय, साकेत, कळवा आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, घोडबंदर रोड, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्यनगर आरोग्य केंद्र, पोस्ट कोविड सेंटर, माजिवडा, वर्तकनगर आरोग्य केंद्र, शीळ आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्नी केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर आरोग्य केंद्र, गांधीनगर आरोग्य केंद्र आणि कौसा आरोग्य केंद्र

लसीकरणासाठी संकेतस्थळावर नोंद करताना काही अडचणी आल्या असल्या तरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींची पथकाने संकेतस्थळावर स्वत: नोंद केली असून त्यानंतर त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद दिला. तसेच लसीकरणाबाबत खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.                        – डॉ. कैलाश पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक

कल्याण-डोंबिवलीत पालिकेची दोन लसीकरण केंद्रे

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील दोन्ही गटांतील रहिवाशांना लस देण्यासाठी पालिकेने कल्याणमध्ये बाई रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या लाभार्थीना या ठिकाणी लस घेता येणार आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी सांगितले.

डॉक्टर आरोग्य सेवकांच्या लसीकरणासाठी कोविन अ‍ॅप -१ होते तर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोविन-२ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. मात्र पहिलाच दिवस असल्याने या संकेतस्थळावर नोंदणीचा भार वाढल्याने काही तांत्रिक अडचणी येत असाव्यात. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम कशी राबवायची याबाबत केंद्र शासनाचे निर्देश प्राप्त होताच तिथे लसीकरण सुरू होईल.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका

लसीकरणासाठी रुग्णालयात ५०हून अधिक नागरिकांनी संपर्क केला होता. मात्र रुग्णालयात लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना काही दिवस थांबण्यास सांगितले आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना आणि लस उपलब्ध होताच लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.

– डॉ. अनिता तारलेकर, शुश्रूषा हार्ट केयर सेंटर स्पेशालिटी रुग्णालय, नेरूळ