ठाण्यात लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचे हाल सुरूच

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आसन व्यवस्था नसल्यामुळे तसेच सातत्याने सव्‍‌र्हर डाऊन होत असल्याने नावनोंदणीस होणाऱ्या विलंबामुळे ज्येष्ठांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना केंद्राबाहेर तब्बल चार ते पाच तास ताटकळत उभे राहवे लागल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही लसीकरण केंद्रांवर नियोजन अभावामुळे ज्येष्ठांचे हाल सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल महापौर नरेश म्हस्के यांनी घेऊन त्या ठिकाणी खुच्र्याची व्यवस्था केल्याने ज्येष्ठांना काहीसा दिलासा मिळाला.

ठाणे शहरातील १५ ठिकाणी महापालिकेने करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. या सर्व ठिकाणी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येते. असे असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी सकाळी ९ वाजता रांगा लावतात. या नागरिकांना दुपारी १२ वाजता केंद्र सुरू झाल्यानंतर क्रमांकाच्या पावत्या देण्यात येतात. गेल्या दोन दिवसांत या केंद्रांवर लसीकरणासाठी येऊन गेलेल्या नागरिकांचे विविध कारणांमुळे हाल झाल्याचे समोर आले होते. असे असतानाच दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाजवळील आयुर्वेदिक हेल्थ सेंटरच्या परिसरात बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याथी असलेल्या नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. याशिवाय, पोलीस आणि आरोग्य सेवक यांनीही दुसरा डोस घेण्यासाठी रांग लावली होती. या ठिकाणी १२ वाजेनंतर नागरिकांना क्रमांकाच्या पावत्या देण्यास सुरुवात झाली. या रांगा वाढतच होत्या. तसेच या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यातच सव्‍‌र्हर डाऊन होत असल्यामुळे नोंदणी प्रक्रियेस उशीर होत होता आणि लसीकरणासाठी मनुष्यबळही कमी होते. या रांगा लवकर पुढे सरकत नसल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत होते, अशी माहिती लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी दिली. असाच काहीसा प्रकार अन्य केंद्रांवर होता. तर मनोरमानगर भागातील केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंत सव्‍‌र्हर डाऊन झाल्याने लसीकरण प्रक्रिया थांबली होती. मानपाडा भागात दुसऱ्या मजल्यावर केंद्र असल्यामुळे ज्येष्ठांना जिने चढून जावे लागते आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तक्रारीची दखल..

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाजवळील आयुर्वेदिक हेल्थ सेंटरमध्ये लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था नसल्याने वृद्धांचे हाल होत आहेत. अशी परिस्थितीत सर्वच ठिकाणी आहे. अशा प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केली होती. त्याचीदखल महापौरांनी घेऊन त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुच्र्याची व्यवस्था केली.

शासकीय रुग्णालयात लसीकरण सुरळीत

एकीकडे ठाणे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचे हाल होत असले तरी दुसरीकडे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मात्र लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू असल्याचे दिसून आले. या ठिकाणी नियोजनबद्ध पद्घतीने लसीकरण करण्यात येत असून या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे दिसून आले. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार हे सातत्याने लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन कामाची पाहाणी करीत असून त्याठिकाणी लसीकरणानंतर भेदरलेल्या रुग्णांना धीर देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे एरवी शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर टीका होत असली तरी लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे काम नियोजन आणि चोख पद्घतीने सुरू असल्याचे दिसून येते.