लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसईच्या ग्रामीण भागांतील करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने कमी होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात ९५ने रुग्णसंख्येत घट झाली असून हळूहळू करोनारुग्ण वाढीचा आलेख  उतरणीला लागला आहे.

वसईतील अर्नाळा, चंद्रपाडा, रानगाव, भाताने, कळंब, यांसह इतर भाग हा ग्रामीण भागात मोडतो. या भागातही शहरी भागाप्रमाणेच करोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला होता. २१ एप्रिल रोजी ग्रामीण भागात पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर या रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ झाली होती. मध्यंतरी दिवसाला ग्रामीणमध्ये १२ ते १५ रुग्णांची वाढ सुरू होती, परंतु नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ऑक्टोबरमध्ये १२३ करोना रुग्ण आढळून आले होते. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ २८ रुग्ण आढळून आले. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ९५ने घट झाली असून एकाचाही मृत्यू झाला नाही. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात केवळ एकच करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये एकूण १ हजार ३६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १ हजार ३१० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण ३.५९ टक्के

वसईच्या ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  त्यातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही ३.५९ टक्के इतकी आहे. वसईत ग्रामीणमध्ये आतापर्यंत ४९ जणांचा बळी गेला आहे. यात गंभीर आजाराचे रुग्ण व ५० वर्षांवरील नागरिक यांचा समावेश आहे.