ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये करोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागला असून सोमवारी भिवंडी महापालिका हद्दीत करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या शहरात चाचण्यांची संख्या दररोज ३०० पेक्षा अधिक असूनही रुग्ण आढळला नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सहाशेपेक्षाही कमी झाली आहे.

आत्तापर्यंत २ लाख १९ हजार ७७९ नागरिकांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ९३.४५ टक्के म्हणजेच २ लाख ७ हजार ५२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २.९२ टक्के म्हणजेच ६ हजार ४२५ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. संसर्गाची तीव्रता घटल्यामुळे जिल्ह्य़ातील बहुतांश करोना रुग्णालयांतील खाटा रिकाम्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जून महिन्यामध्ये करोनामुळे सर्वाधिक  मृत्यू झालेल्या भिवंडी शहरात नव्या आयुक्तांनी राबवलेली मोहीम प्रभावी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून या शहरात १० हून कमी रुग्ण आढळून येत असून सोमवारी या शहरात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्य़ातील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आल्याने जिल्हा आरोग्य विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्य़ातील करोना संसर्गामध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून दररोज सहाशेपेक्षाही कमी रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील मुख्य करोना केंद्र असलेल्या ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरात सध्या दररोज १५० हून कमी, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमध्ये ८० हून कमी, तर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि भिवंडीत २५ हून जणांना करोनाची लागण होत असल्याची माहिती दररोज मिळणाऱ्या करोना अहवालावरून समोर येत आहे. जिल्ह्य़ात आत्तापर्यंत २ लाख हजार ७७९ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ लाख ७ हजार ५२७ बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होणाऱ्यांचे हे प्रमाण ९३.४५ टक्क्यांवर आले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ४२५ इतकी आहे. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या २.९२ टक्के इतके अत्यल्प आहे.

मृत्यूच्या प्रमाणातही घट

सध्या करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळू लागल्याने जिल्ह्य़ात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्य़ात दररोज ३० हून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत होते. सध्या हे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले असून दररोज १५ हूनही कमी रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होत आहे.