लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : गेल्या वर्षी थंडी लांबल्याने मंदावलेली स्वेटरची विक्री यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर चांगलीच वाढली आहे. करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असून थंडीच्या काळात सर्दी-खोकला होऊन करोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिक ऑक्टोबर अखेरपासूनच स्वेटर खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे यंदा थंडीच्या मोसमापूर्वीच ५० टक्के स्वेटरची विक्री झाली आहे, असे शहरातील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमधील बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात लुधियाना येथून स्वेटर विक्रीसाठी येतात. यंदाही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून ठाण्यातील मुख्य बाजारात स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे या कालावधीत स्वेटरला मोठी मागणी असते. यंदा अद्याप थंडी सुरू झालेली नाही. मात्र, यंदा करोनाचा धोका असून हिवाळ्याच्या दिवसात या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यंदा नागरिकांनी ऑक्टोबर महिन्यापासूनच स्वेटर खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्वेटरच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. थंडीच्या काळात आजार बळावून करोनाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांचा स्वेटर खरेदी करण्याकडे जास्त कल आहे.
–  विश्यंभर केवत, स्वेटर विक्रेते