मनसेची कारवाईची मागणी; महापौरांनीही दिले चौकशीचे आदेश

ठाणे : महापालिकेच्या ग्लोबल करोना रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असतानाही या रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा प्रकार मनसेने गुरुवारी उघडकीस आणला.

तसेच या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने पालिका प्रशासनासह ठाणे पोलिसांकडे केली आहे. तर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल करोना रुग्णालयामध्ये एका तरुणाच्या वडिलांना अतिदक्षता विभागातील खाट मिळावी यासाठी त्याच्याकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणी जाधव यांनी ठाणे पोलिसांकडेही तक्रार दाखल केली आहे. पैसे घेणारी व्यक्ती मंत्र्यांपर्यंत पैसे जातात, असे बोलत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर ग्लोबल रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल होत असताना पैसे घेतले गेले अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. ही घटना प्रथमदर्शनी अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. प्रशासन अशा गोष्टी खपवून घेणार नाही. या प्रकरणाची चौकशी करून यात तथ्य आढळल्यास आणि पैसे घेताना निदर्शनास आले तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयामध्ये ठाण्यातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील अनेक करोनाबाधित रुग्ण उपचार घेतले असून या भागातील रुग्ण आजही येथे उपचार घेत आहेत. उपचारासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेकडून आकारले जात नाहीत. त्यामुळे  निश्चितच गोरगरीब रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरत आहे. परंतु या रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचे वृत्त ठाण्यात पसरले असून ही अत्यंत गंभीर व क्लेशदायी बाब आहे, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडे याबाबतचे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते तातडीने महापालिकेस सादर करावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.