भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील इंद्र लोक भागात  महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या खोलींना थेट पालिकेच्याच कर विभागामार्फत अंतिम नोटीस बजावण्यात आल्यामुळे त्या खोलीत राहात असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील इंद्र लोक भागात आरक्षण क्रमांक २२२ व २२२ अ  जागेवर २००७ साली विकासाने ‘अमृत प्रसाद’ या इमारतीची निमिर्ती केली. त्यानंतर या इमारतीत ३० नोव्हेंबर २०१६ रोजी विकासकाने पालिकेला ‘गरीब घरकुल योजने’अंतर्गत स्थलांतरित केली. त्यामुळे या इमारतीत पालिकेने साधारण १४० कुटुंबीयांना स्थलांतरित केले. मात्र या इमारतीत राहात असलेल्या १५ कुटुंबीयांचे रजिस्ट्रेशन अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे त्या खोल्या पालिकेच्याच ताब्यात आहेत.

या खोल्या आपल्या नावावरून करून कर आकारणी करण्याचे पत्र या कुटुंबीयांनी तसेच पालिकेच्या बांधकाम विभागाने कर विभागाला २०१७ रोजी दिले होते. २००७ पासून या खोलीची कर थकबाकी पालिकेच्या नावावर येत असल्याने ती भरणे या कुटुंबीयांना शक्य नाही आहे. त्यामुळे ही कर आकारणी आपल्या नावावर करण्याकरिता पाठपुरवठा करत असतानाच थेट पालिकेच्या मालमत्तेवर अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे नियमानुसार  पालिकेची मालमत्ता ही पालिका आयुक्तांच्या ताब्यात असते. त्यामुळे ही अंतिम नोटीस पालिकेच्या आयुक्तांना बजावण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.