मुंबई : दागिने, महागडय़ा वस्तू किंवा उपकरणे विकत घेऊन त्याचे पैसे ऑनलाईन चुकते केल्याचे भासवून दुकानदरांची फसवणूक करणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. निखिल सुमन असे या तरुणाचे असून, त्याची आई वसई-विरार महापालिकेतील नगरसेविका आहे. या कारवाईनंतर मुंबई, ठाण्यातील आणखी १५ व्यावसायीक फसवणुकीची तक्रार घेऊन पुढे आले आहेत.

मानखुर्द येथील सराफा व्यावसायीकाकडून निखिल याने काही दिवसांपूर्वी साडेपाच लाख रुपये किंमतीचे दागिने विकत घेतले. ही रक्कम ऑनलाईन प्रक्रियेने खात्यावर जमा करतो, असे त्याने दुकानदाराला सांगितले. काही मिनिटांनी त्याने रक्कम जमा केल्याचा लघुसंदेशही दुकानमालकाला दाखवला. तो पाहून दुकानदाराला खात्री पटली आणि निखिल तेथून निसटला. दिवस संपला तरी पैसे खात्यावर न आल्याने दुकानदार चिंतेत पडला. दोन दिवस वाट पाहूनही पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीचा समांतर तपास मालमत्ता कक्षाचे लक्ष्मीकांत साळुंखे यांनी सुरू केला. साळुंखे आणि पथकाने तांत्रिक तपास, खबऱ्यांच्या माध्यमातून निखिलला अटक केली. चौकशीत त्याने अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील अनेक दुकानदारांना फसवल्याची कबुली दिली. आरोपीची आई नगरसेविका आहे. निखिल वाईट मार्गाला लागल्याने त्याच्याशी संबंध तोडल्याचे सुमन कुटुंबीयांनी स्पष्ट केले.