सुरज परमार आत्महत्येप्रकरणी पोलिसांना शरण आलेल्या आरोपी नगरसेवकांच्या समर्थकांनी शनिवारी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या अटकेचा निषेध म्हणून दिवसभर राबोडी परिसरात बंद पाळण्यात आला. तसेच या नगरसेवकांना पोलीस कोठडी सुनावताच न्यायालयाच्या आवारात त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्याचा तसेच पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी सकाळी आठच्या सुमारास परमार आत्महत्या प्रकरणातील आरोपी नगरसेवक हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला हे चौघे पोलिसांना शरण आले. त्यानंतर या आरोपींचे समर्थकांचा जमाव कार्यालयाबाहेर जमला होता. या चारही आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यासाठी नेत असतानाच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे या भागातील वातावरण काही काळ तंग बनले होते. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे कार्यालयात आले आणि पुढील सूत्र वेगाने हलू लागली. ठाणे न्यायालयामध्ये चारही आरोपींना हजर करण्यात येणार असल्यामुळे त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने न्यायालयाबाहेर जमले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयात आरोपींची भेट घेतली. आरोपी नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर पोलीस दोघांना वाहनात बसवून निघाले होते, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारातच घोषणाबाजी देत पोलिसांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.