पूर्वा साडविलकर/किशोर कोकणे

टाळेबंदीने सर्वानाच घरी बसवले; पण कलाकाराला कला स्वस्त बसू देत नाही. तो ती सादर करण्यासाठी नेहमीच आतुरलेला असतो. तशीच काहीशी स्थिती समाजमाध्यमांवरील नवोदित कलाकारांची झाली आहे. समाजमाध्यमांवरील वाहिनीचा प्रेक्षकवर्ग वाढविण्याच्या हेतूने काहींनी घरच्या घरी चित्रफिती तयार केल्या आहेत. त्या सध्या ‘यूटय़ूब’, ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’वर प्रदर्शित केल्या जात आहेत. टाळेबंदीत चित्रीकरण बंद आहे. घराबाहेर पडणे त्यामुळे शक्य नाही; पण ऑनलाइन तंत्राद्वारे इतरांशी संपर्क साधण्यात आला आणि चित्रफिती तयार करण्यात आल्या.

समाजमाध्यमांवर कला सादर करणाऱ्या तरुणांना चित्रीकरणासाठी बाहेर पडावेच लागते. गेले दोन महिने हे सारे बंद आहे. यात  समूहाला भेटता येत नाही, ना एखादी संहिता लिहून तिच्यावर चित्रफीत तयार येते. त्यामुळे त्यांच्या वाहिनीवरील प्रेक्षकांना नवा आशय पोहोचवता येत नाही. यावर उपाय म्हणून ठाण्यातील काही तरुणांनी घरातूनच चित्रफिती तयार केल्या.

कळव्यातील अनुराग जाधव यांनी लघुपट तयार केले. त्यातील ‘उमा अरविंदाचे पत्र’ ही ध्वनिचित्रफीत मालिका. सबुरी कर्वे, तृप्ती गायकवाड, सुमेध समर्थ आणि आदित्य जामगावकर यांनी मिळून ही मालिका सुरू केली. माध्यमे विपुल असली तरी अनेकांना त्यातून एखाद्याशी हवे ते बोलता येत नाही. असे या मालिकांमध्ये उमा आणि अरविंदाचे झाले आहे. उमा आणि अरविंदा हे काही कारणास्तव ते एकमेकांपासून कामानिमित्त लांब आहेत. त्यामुळे ते सध्या पत्रव्यवहारातून एकमेकांशी कसा संवाद साधतात. आंबिवली येथे राहणारे अक्षय कांबळे यांचा यूटय़ूबवर ‘अलिशान’ नावाने वाहिनी आहे. अक्षय या वाहिनीवर गाण्यावर नृत्ये सादर करतो.

आम्ही स्वप्ने मांडतो..

ठाण्यातील ‘नाटय़मय’ या संस्थेने ‘क्वारंटाइन ड्रिमिंग’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ‘नाटय़मय’ समूहाने त्यांच्या ‘नाटय़मय प्रयोग’ या संकेतस्थळावर त्यांच्या प्रेक्षकांना झोपेत पडलेली स्वप्ने सादर केली जातात. प्रेक्षकांची ‘निवडक स्वप्ने’ घेऊन ही संस्था प्रेक्षकांसमोर स्वप्नांचे दृश्यरूप ध्वनिफितीद्वारे मांडते. हा उपक्रम अनेकांच्या पसंतीस येत असल्याचे या समूहातील पवन ठाकरे यांनी सांगितले.