नियम डावलून पुन्हा पदे दिल्याचा आरोप

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेमधील लाच प्रकरणात रंगेहाथ अटक करण्यात आलेले अनेक अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा पालिकेत रुजू झाले आहेत. यातील अनेक अधिकारी पुर्वीच्याच पदावर कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेची ऑगस्ट  २००२ रोजी  स्थापना करण्यात आली. तेव्हापासून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. मात्र हे अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू झालेले आहेत. त्यातील अनेक अधिकारी त्याच पदावर कार्यरत आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रकांत बोरसे, संजय दोंदे, सुनिल यादव, दिलीप जगदाळे, डॉ. रुंदन राठोड, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. संजीवकुमार गायकवाड, प्रशांत जानकर या अधिकाऱ्यांसह उपशिक्षक अनिल आगळे, बालवाडी शिक्षीका अलका पाटील, लिपीक आनंद गबाळे, दशरथ हंडोरे, गणेश गोडगे, महादेव बंदिछोडे, प्रशांत कोळी, राकेश त्रिभुवन, कुंदन पाटील, योगेश शिंदे, नितीन राठोड आदींचा समावेश आहे.

अनधिकृत बांधकामांना संरक्षण, निविदा मंजुरीचे कमीशन, कामाचे देय अदा करण्याचे कमीशन, एलबीटीची माफी, विवाह नोंदणी प्रमाणपत्रसाठी लाच, नियुक्तीपत्रसाठीसाठी लाच, वाढीव वेतनश्रेणी देण्यासाठी पालिका शिक्षिकडुनच लाच, फेरीवाल्यांकडुन लाच असे लाचखोरीचे प्रकार महापालिकेत घडलेले आहेत.

लाचखोरीच्या आरोपीना पुन्हा सेवेत घेताना अकार्यकारी पदावर नेमण्यात यावे, असा नियम आहे. मात्र या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा पूर्वीचीच पदे मिळाली आहेत.  प्रशासनासह सत्ताधारी आणि राजकारण्यांशी लागेबांधे ही पदे मिळविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी केला आहे. चंद्रकांत बोरसे यांना प्रभाग समिती ६ मधील अनधिकृत बांधकामात लाच घेताना पकडले असताना त्यांना त्याच प्रभाग समिती वर प्रभाग अधिकारी म्हणून नेमले आहे . त्यांच्या प्रभागात अनधिकृत बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरु असून त्याच्या अनेक तक्रारी  बोरसे कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आहेत .

प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना प्रभाग समिती १ मध्ये पकडले असताना त्यांना पुन्हा त्याच पदावर नेमले आहे . तेथे देखील मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारी आहेत. संजय दोंदे यांना देखील प्रभाग अधिकारी , विभाग प्रमुख आणि आता कर उपसंकलक अशी पदे दिली आहेत. दिलीप जगदाळे यांना जाहिरात विभाग दिला आहे. भाईंदर  पश्चिम  परिसरातील प्रभाग  क्रमांक २३ मधील भाजप नगरसेविका वर्षभानूशाली यांना २०१४ रोजी ५० हजार रुपयाची  लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या अटकेत ठाणे न्यालयाकडून पाच वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपये दंड ठोकावण्यात आला आहे.