ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार हाच प्रचाराचा मुद्दा

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करायची की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, निवडणुकीत आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ता सचिन सावंत यांनी सोमवारी ठाण्यात दिली. तसेच आगामी निवडणुकीत महापालिकेतील भ्रष्टाचारासह विविध मुद्दय़ांवर प्रचार केला जाणार आहे. याशिवाय, मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा फटका सर्वसामान्य ठाणेकरांनाही बसला आहे. त्यामुळे हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याच्या दुष्परिणामांचाही प्रचार निवडणुकीत केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले असले तरी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. या आरोपानंतर हे दोन्ही पक्षाचे नेते पुन्हा एकत्र येतात. या दोन्ही पक्षांनी लज्जाहीनता दाखविली असून हे सर्व जनतेसमोरच घडत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला अधिक काही दाखवायची गरज नाही, असेही सावंत यांनी सांगितले. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असून या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ठाण्यात येतील आणि विविध पॅकेजच्या घोषणा करतील. पण, कल्याण-डोंबिवलीकर जसे फसले तसे ठाणेकरांनो तुम्ही फसू नका, असेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचारासह विविध मुद्दय़ांवर प्रचार केला जाणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने नोटाबंदीसंदर्भात घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे आणि त्याचा फटका देशभरासह ठाणेकरांनाही बसला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधातही निवडणुकीत प्रचार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदी निर्णयाविरोधात आंदोलन

मोदी सरकारने नोटाबंदीच्या निर्णयातून नेमके काय साध्य केले, याचा गोषवारा जाहीर करणे अपेक्षित होते. पण, या सरकारने तसे केले नाही आणि हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे दाखवून दिले. नोटाबंदीच्या निर्णयाचे दुष्परिणाम देशाच्या अर्थकारणावर झाला आहे. देशाची आर्थिक स्थिती रुळावर येण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात ८ जानेवारीला घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून राज्यातील पालिका निवडणूक काळातही अशा प्रकारे आंदोलन सुरू राहणार आहेत.