केवळ वातानुकूलित दालनात बसून पांढऱ्यावर काळ्या रेघोटय़ा ओढून प्रशासनाचा गाडा चालत नसतो. त्यासाठी जबाबदारीने रस्त्यावरही उतरावे लागते. सामान्यांना दालनाबाहेर ताटकळत न ठेवता त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागतात. या सगळ्या परीक्षेत अतिरिक्त आयुक्त संजय घरत सपशेल अपयशी ठरले.

संपूर्ण महाभारतात संजय हे पात्र केंद्रस्थानी होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विश्वातही गेली अनेक वर्षे संजयचा प्रभाव होता. आयुक्त आणि सत्ता कुणाचीही असो, हुकूम या संजयचाच चाले. कल्याण डोंबिवली पालिकेतील अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे ‘व्हीजेटीआय’चे गुणवंत श्रेणीतील अभियांत्रिकीचे पदवीधर (बी.ई). तांत्रिक क्षेत्राचे अगाध ज्ञान. शहर विकासासाठी पायाभूत सुविधा कशा असाव्यात, याची अचूक माहिती त्यांना आहे. गेल्या २८ वर्षांत कल्याण डोंबिवली पालिकेने घरत यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकासकामांचे अहवाल तयार केले, त्यावरून त्यांची विकासाची दूरदृष्टी दिसून येते. वैद्यकीय जैवविविधतेची विल्हेवाट लावणारा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प माजी आयुक्त श्रीकांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संजय घरत यांनी पालिकेत जिद्दीने उभा केला. तो यशस्वीपणे चालविला. पण, चुकीचा ‘अघोरी’ सल्ला देणारे रिकामे सल्लागार संजय घरत यांच्या प्रगतीच्या मार्गातील मोठे अडसर ठरले. त्यांनी त्यांना चुकीचा मार्ग दाखविला. त्यातून ते भरटकले. पदाचा आणि अधिकारपदाचा दुरुपयोग करू लागले.

आधारवाडी कचराभूमी बंद करून कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प उभारणे, टिटवाळ्यात सर्वोपचारी रुग्णालय, पडझड झालेले सूतिकागृह, विष्णुनगरचा मासळी बाजार, रस्ता रुंदीकरण मोहिमा, ‘झोपु’ प्रकल्प, परिवहन बस प्रकल्प असे अनेक प्रकल्प आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उभारून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची धमक घरत यांच्यात होती. रस्त्यावर उतरून बेकायदा बांधकामांचा चक्काचूर करून भूमाफियांना सळो की पळो करून सोडण्याची ताकद या अधिकाऱ्यात होती. घरंदाज संस्कारात वाढलेला हा अधिकारी नंतर प्रचंड अहंगंडाने पछाडला गेला. दुसऱ्याला कस्पटा समान लेखण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना उत्तरोत्तर अधोगतीकडे नेत गेला. पालिकेचा अधिकारी असल्याने त्यांना प्रशासनाच्या सर्व खाचाखोचा माहिती होत्या.

बहुतांशी नगरसेवक पूर्वाश्रमीचे नाक्यावरचे टोळभैरव, रिक्षाचालक आणि टगे वृत्तीचे. अशा ‘अस्वच्छ’ प्रवाहातून आलेल्या नगरसेवकांना आयुक्तांपेक्षा संजय घरत हे गळ्यातले ताईत वाटायचे. नगरसेवक, आमदार, खासदारांची अंडीपिल्ली आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याची त्यांची पूर्वीपासूनची सवय. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यांच्याशी बोलताना, वागताना थोडा वचकून असायचा. तो धाक त्यांनी कायम ठेवला. समकक्ष, हाताखालच्या अधिकाऱ्यांना दाबण्याची त्यांची एक हातोटी होती. त्यामुळे अधिकारी त्यांना बिचकून असत. ‘आय. ए. एस.’ आयुक्त असेल तर ते वचकून असत. अन्यथा मुख्याधिकारी संवर्गातील आयुक्तांना ते तलाठी तात्या, मामा अशाप्रकारेच संभवत. पालिकेत त्यांनी स्वत:चे प्रस्थ तयार केले होते. मी करीन ती पूर्व दिशा. त्यांचा माणूस, ठेकेदार त्या कामात नसेल तर ते कामाचा बिघाड करणार. आपले म्हणणे, महासभेने, प्रशासनाने मानले नाही तर त्या कामाची वासलात लावयाची ही त्यांची कार्यपद्धती नेहमीच वादग्रस्त ठरली. या हेकटपणामुळे घनकचऱ्याचे अगाध ज्ञान असताना त्यांनी कधीच कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प यशस्वी होऊ दिला नाही, असा त्यांच्यावर नेहमीच आरोप होत राहिला.

झोपडपट्टी योजनेत गरिबांना घरे मिळावीत म्हणून या अधिकाऱ्याने योजनेतील लाभार्थी निश्चित केले नाहीत. पालिकेत चांगले काही शिजत असेल तर त्याला खोडा घालायचा. त्याची मोडतोड करून त्याचा विध्वंस करायचा. प्रसंगी माहिती कार्यकर्त्यांला ‘सेनापती’ करायचे. नागरी समस्या घेऊन येणाऱ्या अभ्यागतांना तासनतास दालनाबाहेर ताटकळत ठेवायचे. नगरसेवक, अधिकाऱ्यांच्यात झुंजी लावून मौज बघायची. अशीच एक झुंज अलीकडे त्यांच्यावर बेफामपणे उलटली. राजकीय सत्तेचे पाठबळ असल्याने आपण आता कल्याण डोंबिवलीचे आयुक्त व्हायचे एवढाचा त्यांचा पण होता. तो साध्य करण्यासाठी आलेल्या आयुक्तांना ते असहकार करत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात असे. गेल्या पाच वर्षांत घरत यांना शासनाने अन्य पालिकांमध्ये आयुक्त म्हणून जाण्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. प्रभाग अधिकारी, बाजार शुल्क, फेरीवाले या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या साखळीचा ‘अखंड स्रोत’ घरत यांनी तयार केला होता. बाहेर गेले तर हा स्रोत आटतो. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून संजय घरत यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे शहर बेढब करणाऱ्या बांधकामांचा चक्काचूर करणे आवश्यक होते. कल्याण डोंबिवलीत नेमके उलट होताना दिसले.  गेल्या दीड वर्षांत ई. रवींद्रन, पी. वेलरासू या आयुक्तांच्या कार्यपद्धतीला घरत वचकून होते. या कालावधीत त्यांची सगळी दुकाने बंद होती. आयुक्त गोविंद बोडके यांनी घरतांचे आर्थिक अधिकार काढून घेतले होते. शामळू बोडकेंपासून आपणास धोका नाही, असा ग्रह करून घरत अधिक ‘सक्रिय’ झाले होते. २७ गाव परिसरातील नांदिवली पंचानंद, भोपर, देसलेपाडा येथील बेकायदा बांधकामे, ‘अ’, ‘ई’, ‘ग’, ‘ह’, ‘ड’ प्रभागांचे प्रभाग अधिकारी हेच संजय घरत यांचे सध्या विश्व होते, असे बोलले जाते. विकास कामे करून शहरवासीयांकडून कौतुकाची थाप मारून घेणे राहिले बाजूला. घरत भलतेच करत राहिले. कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्थेला हा एकप्रकारे धडा आहे.