विकास कामे जादा दराने केल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई

पालघर नगर परिषदेने २०१५मध्ये केलेल्या कामात जादा दराने निविदा मंजूर करून नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका पालघरच्या जिल्ह्य़ाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगरसेवकांवर ठेवला आहे. नगर परिषदेच्या नगरसेवकांचा निष्काळजीपणा आणि गैरवर्तणुकीमुळे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवून ही रक्कम त्यांच्याकडून भरपाई करून घेण्याचे नगरविकास विभागाकडे पाठविलेल्या अहवालामध्ये नमूद आहे.

पालघर वेवूर येथील रहिवासी संतोष पाटील यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे वॉर्ड क्र. १४मधील नवली परिसरात केलेल्या विकास कामांबाबत तक्रार केली. या भागात काँक्रीट रस्ता, समाज मंदिर, गटार आदी ३८ लाख रुपयांची विकास कामे केली. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची असून कोणत्याही तपासणी व गुणचाचणीशिवाय निधी मंजूर करून पालघर नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पालघर नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या आणि ठेकेदाराच्या आर्थिक लाभासाठी जादा दराने निविदा मंजूर केल्याचा आरोप होता. सन २०१५-१६च्या लेखापरीक्षण अहवालात संबंधित गैरप्रकार नमूद करण्यात आला होता. या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कामाचे विशेष लेखापरीक्षण करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.

संतोष पाटील यांनी संबंधित गैरव्यवहाराबाबत पालघर नगर परिषदेकडे तक्रार केली होती. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे २५ जून २०१५मध्ये या संदर्भात तक्रार केली होती. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आणि  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना कारवाई करण्यासंबंधी पत्र लिहिले आहे.

या कामासंदर्भात ५ ऑक्टोबर २०१३ रोजी सर्वसाधारण सभेत या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या सभेला उपस्थित असलेल्या नगराध्यक्षांसह २१ नगरसेवकांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये तत्कालीन दोषी नगरसेवकांवर कारवाई करून त्या सर्वाना निष्कासित करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. असे झाल्यास या दोषी नगरसेवकांना २०१९मधील नगर परिषद निवडणूक लढवण्यासाठीची टांगती तलवार राहणार आहे.

  • तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद पालघर यांचविरुद्ध विकास कामाच्या जादा दराच्या निविदा मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी कामाचे विशेष लेखापरीक्षण आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रारी अर्ज केला होता. त्यातील प्रमुख तक्रारी..
  • पालघर नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांनी स्वत:च्या आणि ठेकेदाराच्या आर्थिक लाभासाठी जास्त दराच्या निविदा मंजूर करून निधीची अफरातफर केली.
  • वॉर्ड क्र. १४मधील नवली-कमारे रस्ता ते मनोज गंगाराम यांच्या घरापर्यंत केलेला काँक्रीट रस्ता निकृष्ट दर्जाचा असताना, कोणत्याही तपासणी व गुणचाचणीशिवाय निधी मंजूर करून आर्थिक नुकसान केले.
  • या कामांचे लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.