राष्ट्रवादी काँग्रेसचा आयुक्त जयस्वाल यांच्यावर आरोप

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत मांडले जाणारे प्रस्ताव बिल्डर आणि ठेकेदारांच्या हिताचे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी महापालिकेत हुकूमशाही पद्धतीने भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला.

घोडबंदर येथील भाईंदरपाडा परिसरातील तब्बल ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे भले मोठे मैदान एका बिल्डरला आंदण देण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा सुरू असून शहरात रस्ता रुंदीकरणासाठी वाटप केल्या जाणाऱ्या कन्स्ट्रक्शन टीडीआर वाटपातही मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. दरम्यान, शनिवारी सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या खाडी पाण्याचे विक्षारण करण्याच्या प्रस्तावास भाजपने विरोध केला असून प्रति हजार लिटरसाठी ६३ रुपये दराने पाणी विकत घेण्याचा प्रस्ताव महापालिकेची लूट करणारा असल्याचा आरोप जयस्वाल यांच्यावर करण्यात आला आहे.

पालिकेच्या शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत ३०० पेक्षा अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून यापैकी काही प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरातील एका मैदानाचा भूखंड बिल्डरला भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव आयुक्त जयस्वाल यांनी या सभेत मांडला. सुशोभीकरण आणि देखभालीसाठी हे मैदान संबंधित बिल्डरला दिले जाणार असून या प्रस्तावास विरोध करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी थेट जयस्वाल यांच्यावर निशाणा साधला.

पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पालिकेचा कारभार जयस्वाल चालवितात.  निवडणुकांनंतर शिवसेना आणि जयस्वाल यांचे जमत नव्हते. मात्र, शनिवारी मांडण्यात येणाऱ्या वादग्रस्त प्रस्तावांच्या मंजुरीसाठी हे दोघे एकत्र आले आहेत, असा आरोप मिलिंद पाटील यांनी केला आहे.

ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी

शहरातील खेळाच्या मैदानांबाबत अद्याप कोणतेही धोरण आखण्यात आलेले नाही. मात्र, ही मैदाने विकासकांना देखभालीसाठी दिली तर तेथे सर्वसामान्यांना प्रवेश बंद होईल. तसेच न्यायालयाने खेळाची मैदाने दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस अन्य कार्यक्रमांसाठी देऊ नयेत असा निर्णय दिला असतानाही पालिकेने प्रस्तावामध्ये ४५ दिवस मैदानांमध्ये विविध कार्यक्रम परवानगी देण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच महापालिकेला स्वस्त दरात पाणी मिळत असतानाही महापालिका खासगी लोकसहभागाच्या माध्यमातून खाडीतील शुद्घ पाणी जास्त दराने विकत घेत असून त्यामुळे ठाणेकरांच्या पैशांची ही एक प्रकारे उधळपट्टी आहे. त्यामुळे या प्रस्तावांना सर्वसाधारण सभेत विरोध करणार असल्याचे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी सांगितले.

..अन्यथा रिक्षाचालकांचा बंदचा इशारा

ठाणे येथील गावदेवी परिसरात गेल्या आठवडय़ात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांनी रिक्षाचालकांना मारहाण केल्याचा आरोप शुक्रवारी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंबंधी वारंवार तक्रार करूनही ठाणे पोलीस दाद देत नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर येत्या २५ मे रोजी ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी बंदचे आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या आंदोलनाला ठाण्यातील ११ रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावा समितीचे सदस्य राज राजापूरकर यांनी केला आहे.