स्थायी समिती सभेत सदस्यांचा आरोप

रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे शहरातील रस्त्यांची कामे कमी दराने ठेकेदारांना दिली जात असून त्यातही ५ टक्के रक्कम ठेकेदार टक्केवारी स्वरुपात देतात. त्यामुळे कमी पैशांमध्ये निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांची निर्मिती होत असून त्यामुळे खड्डय़ांचे द्रुष्टचक्र कायम असल्याची टीका राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केली.

ठाणे शहरातील रस्त्यांवर पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्यामुळे महापालिका प्रशासनावर टीका होत असून  विरोधी पक्षांनीही फलकबाजी करत सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले होते.

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री आणि आयुक्त हे रस्त्यावर उतरल्याबद्दल त्यांचे कौतुक करत रस्त्याला खड्डे पडतातच कसे? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी बैठकीत उपस्थित केला. मुळ रक्कमेच्या १३ ते १५ टक्के कमी दराने रस्त्यांच्या निविदा मंजुर होत असून त्या कशा मंजुर होतात?, एवढया कमी दरात ठेकेदाराला काम कसे परवडते? त्यापैकी २० ते ५० टक्के वाटपही ठेकेदाराला करावे लागते मग यातून शहरातील रस्ते उत्तम कसे होणार? असे मुल्ला म्हणाले. अन्य सदस्यांनीही रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांचा पाढा वाचला.

ठेकेदारांवर कारवाई

ठाणे शहरातील काही प्रमुख रस्त्यांबरोबरच घोडबंदर भागात नव्याने बांधलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्यामुळे त्यास संबधीत ठेकेदाराला जबाबदार धरण्यात यावे. तसेच खड्डे पडलेल्या नवीन रस्त्यांची ठेकेदाराकडून पुन्हा निर्मिती करून घेण्यात यावी, असे आदेश सभापती राम रेपाळे यांनी दिले. त्यांनी नकार दिला तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, असे आदेशही रेपाळे यांनी दिले. खड्डे पडलेल्या रस्त्यांची बांधणी करणाऱ्या संबधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे आश्वासन नगरअभियंता अनिल पाटील यांनी दिले.