पालिकेचा भूखंड म्हाडाच्या नावे केल्याचा आरोप; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेचे चार नगरसेवक शनिवारी पोलिसांना शरण येत असतानाच परमार यांच्या कॉसमॉस समूहाने चितळसर-मानपाडा येथील गृहसंकुलाचे बांधकाम महापालिकेच्या भूखंडावर केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा कॉसमॉस समूहावर हल्ला चढविला. हा भूखंड परस्पर म्हाडाच्या नावे करण्यात आल्याची स्पष्ट कबुली या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी देताच राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिकच आक्रमक झाले. ही जागा महापालिकेच्या नावे करण्यासाठी सप्टेंबरमध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांना महापालिकेकडून पत्र देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी या वेळी दिले. अतिरिक्त आयुक्तांच्या कबुलीजबाबानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याप्रकरणी परमार समूहाविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी लावून धरली.
‘शहरात काही चुकीचे घडत असेल तर आम्ही बोलायचे की नाही हे स्पष्ट करा,’ अशी मागणी करत राष्ट्रवादीचे मिलिंद पाटील आणि अमित सरय्या यांनी परमार समूहाने मानपाडा परिसरातील गृहसंकुल महापालिकेच्या जागेवर उभे केल्याचा आरोप केला. महापालिकेच्या भूखंडावर परस्पर इमारत उभी राहत असताना महापालिका प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. परमार समूहावर प्रशासन मेहेरनजर का दाखवीत आहे, असा सवालही या दोघांनी उपस्थित केला. दरम्यान, यासंबंधीचा आक्षेप पुढे येताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणात समोर येणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

परस्पर हस्तांतरण
मानपाडा-चितळसर भागातील गट क्रमांक ६९ अ (हिस्सा क्रमांक २ग१) हा भूखंड महापालिकेच्या नावे असताना येथील ७२०० चौरस मीटर जागा परस्पर म्हाडाच्या नावे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती उघड झाल्याची कबुली अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. ही जागा पुन्हा महापालिकेच्या नावे केली जावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असेही चव्हाण म्हणाले.