News Flash

करोनामुळे देश-विदेशातील सहली स्थगित

देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू असले तरी नागरिक देशांतर्गत विमान प्रवास करणेही टाळू लागले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पैशांसाठी पर्यटकांचा तगादा, सहल आयोजक हतबल

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : जगभरात थैमान घालणाऱ्या करोनामुळे पर्यटन क्षेत्राचाही बोजवारा उडाला आहे. देशांतर्गत तथा विदेश सहली आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सर्व सहली स्थगित केल्यामुळे सहलींच्या बुकिंगकरिता आगाऊ भरलेले पैसे परत मिळावे, यासाठी पर्यटकांकडून तगादा लावला जात असताना विमानकंपन्या तथा अन्यत्र हे पैसे गुंतवले गेल्यामुळे पर्यटकांचे पैसे परत करण्यास ट्रॅव्हॅल्स कंपन्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे पर्यटक आणि ट्रॅव्हल्स कंपन्या यांच्यात वादंग झडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

करोनाच्या प्रभावामुळे वसईतील पर्यटन क्षेत्र घुसळून निघाले असून त्यातून सहल आयोजक आणि पर्यटक यांच्यामध्ये वादंग पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. वसईत जवळपास शंभरच्या आसपास देशांतर्गत तथा विदेश सहलींचे आयोजन करणाऱ्या खासगी कंपन्या आहेत. दरवर्षी वसईतून देशाच्या विविध भागांत तसेच परदेशात सहली निघतात. यासाठी सहा महिने आधीच बुकिंग केली जाते. त्यासाठी विशिष्ट रक्कमही सहल आयोजकांकडे आगाऊ भरली जाते.

यावेळीही करोनामुळे एप्रिल, मे महिन्यातील देशांतर्गत तसेच परदेश सहली स्थगित झाल्यामुळे सहल कंपन्यांकडे भरलेले पैसे बुडण्याच्या शंकेने पर्यटक धास्तावले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी आगाऊ भरलेले पैसे परत मिळण्यासाठी सहल आयोजक कंपन्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वसईतील काही सहल आयोजक कंपन्यांची बैठक रविवारी वसईत पार पडली. सहली जरी स्थगित झाल्या असल्या तरी करोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर होणाऱ्या सहलींमध्ये पैसे भरलेल्या पर्यटकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

आगाशी येथील अ‍ॅड. तुषार कवळी हे मे महिन्यात परदेशगमन करणार होते. यासाठी त्यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यातच आगाऊ बुकिंगकरिता एका खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून पैसे भरले होते. मात्र, करोनामुळे या सहली स्थगित झाल्या आहेत. अ‍ॅड. कवळी यांनी ट्रॅव्हल कंपनीकडे पैसे परत मिळण्याची मागणी केली. मात्र, पैसे परत देण्याऐवजी त्यांना पुढील सहलीत समाविष्ट करण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले. याशिवाय गास येथील विलास डाबरे हेही यंदाच्या उन्हाळ्यात इजिप्त, इस्रायल या देशांना भेटी देणार होते. मात्र, करोनामुळे त्यांचाही बेत फसला आहे. तथापी, सहल आयोजकांनी त्यांनाही पैसे परत करण्याऐवजी परिस्थिती सुरळीत झाल्यावर सहलीची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

करोनाच्या भीतीमुळे सध्या आंतरराष्ट्रीय विमानोड्डाण बंद आहे. देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू असले तरी नागरिक देशांतर्गत विमान प्रवास करणेही टाळू लागले आहेत. यामुळे सहल आयोजक कंपन्यांचेही मोठे नुकसान होत आहे, असे देशांतर्गत सहलींचे आयोजन करणाऱ्या वसईतील वेलंकनी यात्रेकरी संघटनेच्या लविना डिकॉस्टा यांनी सांगितले.

पर्यटकांनी बुकिंगसाठी जी रक्कम दिली होती, ती आम्ही अन्यत्र गुंतवली आहे. पर्यटकांनी सहल आयोजक कंपन्यांच्याही अडचणी समजून घ्याव्या. गैरसमज करून घेऊ नये आणि पैसे बुडतील, अशी भीतीही बाळगू नये’, असेही लविना डीकॉस्टा म्हणाल्या.

वसईतील ‘एंजल्स टुर्स’तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सहली आयोजित केल्या जातात. करोनाच्या भीतीमुळे कंपनीने यावेळच्या सर्व सहली स्थगित केल्या आहेत.

पर्यटक सहलीच्या बुकिंगकरिता जे पैसे भरतात, ते पैसे आम्ही विमान कंपन्या, हॉटेल्स, रेल्वे वा अन्य ठिकाणी गुंतवतो. हे गुंतवलेले पैसे आम्हाला ताबडतोब परत मिळत नाहीत. काहीवेळा सहल रद्द झाली तरी हे पैसे परत मिळण्याची शक्यताच नसते. परिणामी पर्यटकांचे सर्वच्या सर्व पैसे देणे शक्य होत नाही. मात्र, कोणत्याही पर्यटकाचे आर्थिक नुकसान होणार नाही.

– लविना डिकॉस्टा,वेलंकनी यात्रेकरू संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:29 am

Web Title: country overseas trip postponed because of the coronavirus zws 70
Next Stories
1 एक हजार ६३४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर
2 सौरऊर्जेवरील दिवे, विद्युत वाहने ; वसईच्या तरुणाची अनोखी शक्कल
3 करोना निर्बंधांचे पालन न केल्यास कारवाई
Just Now!
X