भिवंडीतील पडघा येथील दाम्पत्यास अटक

ठाणे : कर्जात बुडालेल्या एका दाम्पत्याने कर्जापासून मुक्ती मिळविण्यासाठी घरासमोर राहणाऱ्या सोनूबाई चौधरी (७० ) या वृद्ध महिलेचा खून करून तिचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील पडघा भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी नीलम या दोघांना अटक केली आहे. नीलम हिने टीव्हीवर दाखविण्यात येणाऱ्या क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडिया या मालिका पाहून हत्येचा कट रचल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

सोनूबाई ही मारेकरी सोमनाथच्या वडिलांची आत्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या दांपत्याकडून २ लाख ९० हजार ५०० रुपयांचे दागिने जप्त केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी दिली.

भिवंडी येथील वडूनवघर या गावातील एका तलावामध्ये २३ नोव्हेंबरला एका ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. भिवंडी तालुका आणि गुन्हे अन्वेषण शाखेने सुरूवातीला ठाणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यात वृद्ध महिला हरविल्याच्या तक्रारी दाखल आहेत का याची तपासणी केली. त्या वेळी चौधरपाडा भागात राहणाऱ्या सोनूबाई चौधरी (७०) या हरविल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच वृद्धेच्या नातेवाईकांना मृतदेह दाखविल्यानंतर तो सोनूबाई यांचाच असल्याची खात्री पोलिसांना झाली. गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी वडूनघर ते चौधरपाडा या भागातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले. पोलिसांचे पथक सोनुबाई यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करत असताना सोमनाथ याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळली. त्यामुळे संशयाच्या बळावर पोलिसांनी त्याच्या उत्तरांचा तांत्रिक तपास केला व त्याआधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याच्या जबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमनाथची पत्नी नीलम हीलाही अटक केली.  या दोघांनी सोनूबाई यांना २१ नोव्हेंबरला दुपारी घरी जेवणासाठी बोलावून तिचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्ज फेडण्यासाठी कट

सोमनाथ आणि नीलम यांच्यावर आधीपासूनच मोठे कर्ज होते. त्यात त्यांनी एक मोबाइल, वातानुकूलित यंत्र आणि दुचाकीही हप्त्यावर खरेदी केली. मात्र, या कर्जाचे हप्ते फेडणे शक्य होत नव्हते. त्याचवेळी या दाम्पत्याची नजर सोनुबाई यांच्या अंगावरील दागिन्यांकडे गेली. त्यातूनच सोनुबाई यांची हत्या करून हे दागिने लांबवण्याचा कट पतीपत्नीने रचला. २१ नोव्हेंबरला दुपारी नीलमने त्यांना जेवणासाठी घरी बोलावले. सोनूबाई घरात आल्यानंतर, सोमनाथ आणि नीलम या दोघांनी त्यांना कपडे धुवण्याच्या धुपाटण्याने मारहाण केली. यात सोनाबाईचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमनाथने एका मित्राची कार डॉक्टरकडे जायचे असल्याचे सांगून मागून घेतली. या कारमधून सोनूबाई हिचा मृतदेह १२ किलोमीटर लांब असलेल्या वडूनवघर येथील तलावात फेकून दिला.