बदलापूर पूर्वेकडील पनवेलकर नगरी येथे पहिल्या मजल्यावरील राजेंद्र बसनकर यांच्या घरात किचनमधील फ्रीजमध्ये आग लागून किचन जळून खाक झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उशिरा घडला. मात्र, ही आग अग्निशमन दलाने नाही तर सोसायटीमधील राहुल बागुल (३१) या तरुणाने प्रसंगावधान राखत विझवली आहे. यात तरुणाचा हात भाजल्याने तो जखमी झाला असून सोसायटीतील अन्य सदस्यांनी त्याला मदत करत आग थोपवून धरल्याने पुढील दुर्घटना टळली. मात्र, अग्निशमन दल वेळेत न पोहचू शकल्याबद्दल सोसायटीतील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
सोमवारी दुपारनंतर फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा प्रकार घडला. बसनकर यांच्या पत्नीने यावेळी आरडा-ओरडा केला. संकुलातील अनेकांनी गर्दी केली पण आग विझवण्यास कुणीही धजावत नव्हते. राहूल बागुल यांनी आग विझवण्यास सुरूवात केली. पेशाने एरोनॉटिकल अभियंता असल्याने राहूल यांनी आग विझवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी पाण्याच्या बादल्या घेत यावेळी फ्रिजमधील आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत किचन व हॉलमधील मोकळ्या भागात वाळत घातलेल्या कपडय़ांनीही यावेळी पेट घेतला होता. यातील काही कपडे राहूल यांच्या हातावर पडल्याने त्यांचा हात यावेळी भाजला. मात्र, तरीही त्यांनी या कपडय़ांवर पाणी टाकत ती आगही विझवली.