चौपडा कोर्टऐवजी ‘उल्हासनगर दिवाणी आणि फौजदारी न्यायालय’

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : उल्हासनगर न्यायालयाच्या वास्तूचा ‘चोपरा किंवा चोपडा कोर्ट’ असा उल्लेख नागरिकांकडून केला जात होता. मात्र, हा प्रचलित उल्लेख बंद व्हावा यासाठी न्यायालयाने प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर कमान उभारून त्यावर ‘उल्हासनगर दिवाणी आणि फौजदारी न्यायालय’ असे नाव देण्यात आले आहे. मंगळवारी या कमानीचे अनावरण न्या. विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले.

न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न आणि दडपणविरहित वातावरण अनुभवता यावे, यासाठी न्यायालयाच्या रंगरंगोटीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. उल्हासनगर न्यायालय हीच ओळख सर्वांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा न्या. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. उल्हासनगर शहरामध्ये उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश चित्ततोष मुखर्जी यांच्या हस्ते आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत १० नोव्हेंबर १९८९ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून या न्यायालयाला चोपडा किंवा चोपरा न्यायालय या नावानेच ओळखले जात होते.

गेल्या काही वर्षांत न्यायालयाच्या या इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसह रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच या इमारतीच्या प्रवेशद्वारावर न्यायालयाच्या नावाचा फलकच नव्हता. त्यामुळे अनेकदा पहिल्यांदा न्यायालयात येणाऱ्या व्यक्तीला न्यायालय ओळखण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर कमान उभारून त्याच्यावर उल्हासनगर दिवाणी व फौजदारी न्यायालय असा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश विजय चव्हाण यांच्या हस्ते या कमानीचे अनावरण करण्यात आले. यावेळी न्यायालयातील सहकारी न्यायाधीश, बार कौन्सिलचे अध्यक्ष सदाशीव रणदिवे आणि वकील मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.

चोपरा किंवा चोपडा या आडनावाच्या व्यक्तीमुळे हे नाव प्रचलित झाले असावे असे बोलले जाते. मात्र तसे नसल्याचे दिसून येते. कागदपत्रांना सिंधी भाषेतच चोपडा असे म्हणतात. त्यामुळे दस्तऐवज किंवा कागदपत्रांची जागा म्हणून चोपडा असे नामकरण झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

‘न्यायालय शोधण्याची वेळ’

स्वत: आपल्याला पहिल्यांदा न्यायालय शोधताना अडचणी आल्या. त्याचवेळी न्यायालयाचे नूतनीकरण आणि नामफलक बसविण्याचा निर्धार केला, असे न्या. चव्हाण यांनी सांगितले. नामफलक आणि नूतनीकरण माझ्याच कार्यकाळात झाल्याने समाधान वाटते आहे. तसेच न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला न्यायालयाच्या आवारात फिरताना प्रसन्न आणि दडपणविरहित वातावरण असावे असे वाटते. त्यातूनच हे काम पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.