News Flash

ठाकुर्लीतील ‘त्या’ इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाकुर्लीतील वाळकु जोशी आणि शिवकृपा या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी येत्या सात दिवसांत घरे रिकामी करावीत.

डोंबिवली : ठाकुर्लीतील वाळकु जोशी आणि शिवकृपा या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी येत्या सात दिवसांत घरे रिकामी करावीत. या कालावधीत रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास असमर्थता दर्शविली तर कल्याण-डोंबिवली पालिकेने पोलिसांच्या साहाय्याने रहिवाशांना घराबाहेर काढावे. या दोन्ही अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासह खंडपीठाने दिले.

या इमारती जमीनदोस्त करण्यापूर्वी पालिकेने या इमारतींमध्ये निवास करीत असलेल्या सर्व रहिवाशांची माहिती, ते राहत असलेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ, सदस्य संख्या अशी सगळी माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर या इमारतींवर कारवाई करावी, असे न्यायालयाने सुचविले. या इमारतींच्या जमीन मालकाने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना जमीन मालक पुनर्विकसित करीत असलेल्या किंवा बांधत असलेल्या इमारतींमध्ये कायदेशीर तरतुदी पूर्ण करून निवासाची सोय करावी. इमारत तोडकाम सुरू असताना कोणीही भोगवटादार घर रिकामे करण्यास, तेथून बाहेर पडण्यास नकार देत असेल आणि तोडकाम सुरू असताना काही दुर्घटना घडली तर जमीन मालक किंवा पालिका त्याला जबाबदार असणार नाही, असे न्यायालयाने याचिका निकाली काढताना सांगितले.

या अतिधोकादायक इमारतींवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या दोन आठवडय़ांत पालिकेला न्यायालयात दाखल करावा लागणार आहे. ठाकुर्लीतील सपना इमारत धोकादायक झाल्याने तेथील रहिवाशांना मालकाने त्याच परिसरातील वाळकु आणि शिवकृपा इमारतीत स्थलांतरित केले होते. आता या दोन्ही इमारती धोकादायक झाल्या आहेत. सपना इमारतीचा पुनर्विकास होत नाही. तेथे आपणास घर मिळते की नाही अशी भीती रहिवाशांना आहे. त्यात वाळकु, शिवकृपा इमारतीमधील हक्क सोडला तर पुन्हा बेघर होऊ अशी भीती रहिवाशांना आहे. या इमारती धोकादायक झाल्याने पालिकेने रहिवाशांना इमारती रिकामी करण्यासाठी नोटिसा पाठविल्या होत्या. या इमारतींमधील २४ सदस्यांनी पालिकेच्या नोटिशीला उच्च न्यायालयात पाच वर्षांपूर्वी आव्हान दिले होते. न्यायालयाने या इमारती धोकादायक झाल्याने त्या रिकाम्या करण्याचे आणि जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. पालिका हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर झाल्याने कल्याण-डोंबिवली पालिकेने या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज न्यायालयात केला होता. पालिकेचे सल्लागार वकील अ‍ॅड. ए. एस. राव यांनी न्यायालयाला सांगितले, या इमारती अतिधोकादायक झाल्या आहेत. वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला असल्याने त्या कोसळल्या तर जीवित, वित्तहानी होईलच, शिवाय रस्त्यावरील पादचारी, बाजूच्या इमारतींना त्यापासून धोका आहे. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. राहुल कदम यांनी न्यायालयाला सांगितले, या इमारतीच्या तळमजल्याला फक्त चार व्यापारी गाळे आहेत. उर्वरित निवासी इमारत रिकामी आहे. जमीन मालकाने त्याने बांधलेल्या इमारतीत किंवा त्याच भागात रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून येत्या सात दिवसांत दोन्ही इमारती खाली करून जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:01 am

Web Title: court orders demolition buildings thakurli ssh 93
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर आज लसीकरण बंद
2 शुल्क कमी करण्याची मागणी केल्याने मुलास शाळेतून काढले
3 लस घेण्यापूर्वीच लसीकरण झाल्याची नोंद
Just Now!
X