ठाणे जिल्ह्य़ात करोनाबाधित सापडण्याचे प्रमाण घटले

ठाणे : जिल्ह्य़ात दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दहा दिवसांपासून उतरण सुरू झाली आहे. सुरुवातीपासून बाधितांचे अधिक प्रमाण असणाऱ्या कल्याण-डोंबिवली तसेच नवी मुंबई शहरातही दररोज दोनशेपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी दररोज सतराशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. हा आकडा आता एक हजाराच्या आसपास स्थिरावू लागला आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत २ लाख ७ हजार ४१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ९० हजार ३५६ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.९४ टक्के आहे, तर ५.५३ टक्के म्हणजेच ११ हजार ४५९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५ हजार २२६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृत्यूचा दर २.५३ टक्के आहे. सध्या सर्वच शहरांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात दररोज सतराशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आठवडाभरापासून एक हजारापेक्षाही कमी रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात दररोज ३५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. सध्या संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने ठाणे शहरात दररोज २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत.

कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांत गेल्या महिन्यात दररोज ४०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. या दोन्ही शहरांमधील रुग्णवाढीचे हेच प्रमाण आता २२५ पेक्षाही खाली आले आहे, तर दररोज २०० ते २५० रुग्ण आढळणाऱ्या मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रातही सध्या दररोज १५० पेक्षाही कमी रुग्ण आढळत आहेत. याचबरोबर उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूर शहरांमध्येही रुग्णवाढीचा वेग मंदावला असून या सर्व शहरांमध्ये दररोज ५० हूनही कमी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणांवर आलेला भार कमी झाला आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या

शहर                        करोनामुक्त            उपचाराधीन              मृत्यू

ठाणे                             ४१७६७                       २५१४                 ११३०

कल्याण-डोंबिवली       ४५९८०                         २२०८                ९९३

नवी मुंबई                    ४०४००                          २३४८                ८७५

मीरा-भाईंदर                २०१८९                         ११६२                 ६९८

ठाणे ग्रामीण                  १४०८०                        १८९५                 ५०८

उल्हासनगर                   ९१९१                          ५७५                   ३३३

बदलापूर                        ६८१२                         २८५                  ९६

अंबरनाथ                       ६७०६                         २०६                   २६०

भिवंडी                           ५२३०                          २६६                 ३३०

 

मृत्यूच्या प्रमाणातही घट

सध्या रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने नव्या करोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूच्या प्रमाणातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात करोनामुळे दररोज ४० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, रुग्णसंख्या घटल्याने आणि नव्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्यामुळे सध्या करोनामुळे दिवसाला ३० हून कमी रुग्णांचा मृत्यू होत आहे.