करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९३ टक्के, तर मृत्युदर २.४९ टक्के

ठाणे : महापालिका क्षेत्रात चार दिवसांपूर्वी करोना रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवसांवर पोहोचला होता. असे असताना गेल्या चार दिवसांत त्यामध्ये वाढ होऊन तो आता १६५ दिवसांवर आला आहे. करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९१ टक्क्यांवरून ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. याशिवाय मृत्युदर २.४९ टक्क्यांवर आला आहे. तसेच रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.७४ टक्क्यांवर आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत जुलै महिन्यात दररोज सरासरी ३५२ रुग्ण आढळून येत होते. ऑगस्ट महिन्यात दररोज सरासरी २०० रुग्ण आढळून येत होते. ऑगस्ट महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र असताना सप्टेंबर महिन्यात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली होती. या महिन्यात दररोज सरासरी ३६२ रुग्ण आढळून येत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या पुन्हा कमी होऊ लागली असून दररोज सरासरी दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना पालिकेकडून करण्यात येत असून त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असतानाच दुसरीकडे आता करोना रुग्णदुपटीचा कालावधी १६५ दिवसांवर पोहोचला आहे. चार दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवसांचा होता. त्याआधीच्या सात दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर पोहोचला होता. त्यामुळे रुग्णदुपटीच्या कालावधीत चांगली सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. तसेच काही दिवसांपूर्वी करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. ते आता ९३ टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरात दररोज होणाऱ्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ९.९४ टक्क्यांवरून ९.७४ टक्क्यांवर आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील मृत्यूचा दरही कमी होऊन तो २.४९ टक्क्यांवर आला आहे.

ठाणे शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत शहरामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर यापूर्वीही अशाच प्रकारे दोनदा सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करणे शक्य झाले आहे. वेळीच उपचार मिळत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये येत्या पंधरा दिवसांत आणखी वाढ होईल. त्याचबरोबर एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८ टक्क्यांवर आणि मृत्युदर आणखी कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.   – डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका