कल्याण-डोंबिवली महापालिकेचा जिल्हा प्रशासनासमोर प्रस्ताव

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : करोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारण्यासाठी महापालिका हद्दीत पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने आता भिवंडी आणि कल्याणच्या वेशीवर असलेल्या गोदामांच्या परिसरात करोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनापुढे ठेवला आहे. याशिवाय टिटवाळा तसेच आसपासच्या परिसरातही काही जागांचा शोध सुरू असून महापालिका हद्दीत उभारण्यात येणारी ही रुग्णालये पुढेही कायमस्वरूपात वापरात आणली जातील असे नियोजन केले जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

भिवंडीजवळ प्रशस्त गोदामे आहेत. अशाच प्रकारची निवडक गोदामे ताब्यात घेऊन तिथे सुमारे एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले जात आहे. जागेची पाहणी, संबंधित मालकाशी बोलणे सुरू आहे. तसेच अशा स्वरूपाचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जात आहे, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. महालिकेला सर्वसमावेशक आरक्षणाखाली विकासकांकडून टिटवाळा, कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागात आरक्षित जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही जागांमध्ये ७५-७५ अशी १५० खाटांची रुग्णालये सुरू करता येणार आहेत. पालिकेच्या मालकीच्या जागा असल्याने ही रुग्णालये कायमस्वरूपी वापरता येणार आहेत. याशिवाय डोंबिवली जिमखाना, क्रीडासंकुलातील मॉल, बंदिस्त सभागृह यांचाही पर्यायी वैद्यकीय व्यवस्थेसाठी विचार केला जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

१२०० खाटांची क्षमता

पावसाळ्यात करोना रुग्णांमध्ये होणारी वाढ विचारात घेऊन पालिका प्रशासनाने उपलब्ध रुग्णालयांशिवाय पाच नवीन १२०० खाटांची रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाबाधित व इतर आजारांच्या रुग्णांचा विचार करून प्रशासन येत्या दोन महिन्यांत तीन ते चार हजार खाटांची व्यवस्था करत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.