21 September 2020

News Flash

गृह अलगीकरणातून ‘कडोंमपा’त रुग्णवाढ

कुटुंबाला संसर्ग; बाधितांना विलगीकरण केंद्रात हलविणार

प्रतिनिधिक छायाचित्र

कुटुंबाला संसर्ग; बाधितांना विलगीकरण केंद्रात हलविणार

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत करोना रुग्ण सापडल्यानंतर त्याला घरातच अलगीकरणात ठेवण्याचे काम पालिकेकडून मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. घरात अलगीकरणातील रुग्ण नियम पाळत नसल्याने घरातील इतर समस्य बाधित होत आहेत. यामुळे कुटुंबाला संसर्गाचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने अलगीकरणातील बाधितांना पालिकेच्या विलगीकरण केंद्रात हलविण्यास सुरुवात केली आहे.

शासन आदेशाप्रमाणे घरात दोन स्वच्छतागृहे, दोन ते तीन स्वतंत्र खोल्या असतील तर करोनाबाधित रुग्णाला घरातच अलगीकरणात ठेवण्याचे स्थानिक प्रशासनांना आदेश होते. त्याप्रमाणे पालिकेने करोनाबाधित रुग्ण सापडला तर त्याला घरातच अलगीकरणात ठेवण्याची मोहीम सुरू केली होती. काही दिवसांपासून डोंबिवलीत रुग्णवाहिका चालक बाधित रुग्णांना नेण्यासाठी महापालिका पथकांबरोबर फिरले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना करोनाबाधित रुग्ण चाळ, खोलीतच अलगीकरणात ठेवावे लागले. एकाच घरातील दोन खोल्यांमुळे चार ते पाच सदस्य राहत असतील, घरात एकच स्वच्छतागृह असेल तर करोना संसर्गाचा धोका अधिक असतो. हे माहिती असूनही काही भागांत रुग्णवाहिका किंवा बाधित रुग्णांना नेण्यासाठी वाहन नसल्याने घरातच अलगीकरणात ठेवले. बाधित रुग्ण घरात एका खोलीत बंदिस्त ठेवला तरी त्याचा वावर घरातील इतर ठिकाणी राहतो.

कंटाळा आला तर हे रुग्ण सोसायटीच्या गच्चीवर जाऊन येरझाऱ्या मारतात. त्यामुळे दरवाजा, जिना व इतर कोठेतरी हात लागतो. शिंकण्याची प्रक्रिया होते. याचे भान बाधित रुग्णांना नसते. त्यामुळे बाधित रुग्णाच्या घरातील सदस्य आणि इमारतीमधील इतर रहिवाशांना करोनाची लागण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण घरात अलगीकरणात ठेवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. घरात एक ते दोन सदस्य असतील, दोन स्वच्छतागृहे, स्नानगृहे असतील. प्रशस्त घर असेल तरच कर्मचारी बाधिताला घरात अलगीकरणात ठेवण्यास मुभा देतात, अन्यथा त्याची रवानगी टाटा आमंत्रा येथील विलगीकरण केंद्रात केली जाते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रुग्णांकडून नियमांना हरताळ

काही सोसायटय़ांमध्ये उद्वाहन असते. काही वेळा सोसायटी सदस्यांची नजर चुकून हातावर अलगीकरणाचा शिक्का मारलेले, बाधित रुग्ण उद्वाहनमधून सोसायटीच्या तळमजल्याला फुले खुडण्यासाठी येतात. काही हातमोजे घालून बाजारपेठेत फिरतात. हळूच गुपचूप घरी निघून जातात. असे बेशिस्त बाधित सदस्य करोनाचा सर्वाधिक फैलाव करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

घरी जाताय..मग जा!

टाटा आमंत्रा येथील विलगीकरण केंद्रात कल्याणमधील तीन करोना रुग्ण उपचार घेत होते. पाच दिवसांचा औषधसाठा संपला. आपल्याकडे कोणी डॉक्टर फिरकत नाहीत. आपली चाचणी कधी होईल याची माहिती केंद्रातून दिली जात नाही. रांगेतून डॉक्टरांची भेट झाली तर ‘तुम्हाला आता काही नाही ना. तुम्ही खोलीत आराम करा’, असा सल्ला देण्यात आला. सहाव्या दिवशी खोलीत पडून राहण्यापेक्षा हे करोना रुग्ण आपले सामान घेऊन विलगीकरण खोलीतून बाहेर पडून केंद्राच्या तळमजल्याला आले. ‘आता आम्ही ठीक आहोत घरी जाऊ का’ अशी विचारणा त्यांनी तेथील डॉक्टरांना केली. त्यांनी तात्काळ त्यांना ‘जा बिनधास्त’. पुन्हा करोना चाचणीची गरज आहे का. त्यांना गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या तिघांना तात्काळ केंद्रातून मुक्त केले. आम्हाला घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा केंद्रातील एखादे वाहन उपलब्ध करून द्या, अशी विचारणा तीन रुग्णांनी तेथील कर्मचाऱ्यांना केली. तेव्हा त्यांनी ‘तुम्हाला चांगले चालता बोलता येते. तुम्हाला त्याची काही गरज नाही. ते पाहा समोर रिक्षा उभ्या आहेत. त्यात बसा आणि घरी जा’, असा सल्ला कर्मचाऱ्याने रुग्णांना दिला. तिन्ही रुग्ण त्या रिक्षात प्रवासी म्हणून बसले आणि चालकाने हे प्रवासी असावेत म्हणून मागचापुढचा विचार न करता त्यांना घरी आणून सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:26 am

Web Title: covid 19 patients increased due to home quarantine in kalyan dombivali zws 70
Next Stories
1 रुग्णालयातील खाटांची माहिती एका क्लिकवर
2 वसई रेल्वेच्या हद्दीत सहा महिन्यांत ११७ रेल्वे अपघात
3 करोनामुळे नाटय़गृहाचे काम रखडले
Just Now!
X