13 August 2020

News Flash

करोनाकेंद्रातील रुग्णांचे हाल

जीजी महाविद्यालयातील केंद्रात डॉक्टरांची वानवा, पाण्याची सोय देखील नसल्याच्या तक्रारी

जीजी महाविद्यालयातील केंद्रात डॉक्टरांची वानवा, पाण्याची सोय देखील नसल्याच्या तक्रारी

विरार : वसई-विरार परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका विलगीकरण कक्षात रुग्णाची संख्यासुद्धा वाढत आहे. पण या कक्षात डॉक्टरांची वानवा असल्याच्या तक्रारी येथे असलेल्या रुग्णांनी केल्या आहेत. यामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारावर रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वसई-विरार महापालिकेने परिसरात वाढती रुग्णांची संख्या पाहता वसईच्या संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात करोना उपचार कक्ष तयार केला आहे. पण या कक्षात रुग्णांना आवश्यक सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्ण करत आहेत. या कक्षात रुग्णांना नियमित तपासणीसाठी डॉक्टर येत नसल्याची तक्रार येथील रुग्णांनी केली आहे. वसईतील रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांची करोना चाचणी सकारत्मक आल्याने त्यांना या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. पण तीन दिवस उलटून गेले तरी कुणीही डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर येथे केवळ परिचारिकेकडून बाहेरून रुग्णांना आवाज देऊन काही त्रास होतो की नाही अशी तपासणी केली जाते. येथे असलेले वयोवृद्ध रुग्णांचे रक्तदाब आणि ऑक्सिजनची चाचणी नियमित केली जाणे आवश्यक असतानाही ह्या चाचण्या होत नाही. केवळ त्यांना हायड्रोक्लोरोक्विन या औषधाच्या गोळ्या देऊन पाच दिवस ठेवून घरी पाठवले जात आहे. या केंद्रात शौचालयांची कमतरता आहे. त्यामुळे येथील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे किमान फिरते शौचालय तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी येथील रुग्णांनी केली आहे. तर अशाच प्रकारची तक्रार वकील रोशन पाटील यांनी केली आहे.

या कक्षातील गैरसोयींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उमेळमान परिसरारतील ८ संशयित रुग्ण २७ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या कक्षात पिण्याच्या पाण्याची सोय तसेच सॅनिटायझर नसल्याचे त्यांनी सांगितले. कक्षाची सफाई आणि निर्जंतुकीकरण केले जात नाही. येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना नियमित गरम पाणी पिण्यासाठी सांगितले जाते पण त्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्याच बरोबर इंटरनेट अथवा इतर विरंगुळ्याच्या साधनांची सोय नाही, असे पाटील यांनी आयुक्तांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

चाचणीसाठी योग्य पद्धत हवी

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय येथे असलेल्या करोना उपचार केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाची सात दिवसांनी सीबीसी आणि सीएसआर ही रक्तचाचणी केली जाते. या चाचणी अहवालानुसार रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास त्याला घरी जाण्याची परवानगी दिली जाते. सुविधांची वानवा असल्याने रुग्ण घरी जाण्यासाठी धडपड करतात. यामुळे आपली रक्तचाचणी लवकर व्हावी यासाठी दररोज रुग्ण मोठी गर्दी करून दाटीवाटीने उभे राहून या चाचण्या करीत आहेत. येथील रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, पण गर्दीच्या सहवासात आल्यास त्यांना अधिक धोका निर्माण होऊ  शकत असल्याने प्रशासनाने या चाचणीसाठी योग्य पद्धत राबवावी, अशी मागणी रुग्ण करीत आहेत.

सफाई कर्मचारी नियमित सफाई करत आहेत. त्याच बरोबर दोन्ही सत्रात डॉक्टर आणि आरोग्य सेवक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शक्य तितक्या सुविधा महापालिका देत आहे.  

– गंगाथरन डी. आयुक्त, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 4:12 am

Web Title: covid 19 patients isolation cell suffer due to lack of facility zws 70
Next Stories
1 टाळेबंदीमुळे रानमेव्यापाठोपाठ रानभाज्यांवरही संक्रांत
2 सुशोभीकरणाच्या कामामुळे कोंडीची समस्या
3 वाढीव वीज देयकांचा चटका
Just Now!
X