पाच नव्या प्रयोगशाळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

बदलापूर : मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी अजूनही अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर यांसारख्या शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण नगण्य आहे. हे प्रमाण वाढावे यासाठी उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले असून पाच ठिकाणी नव्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे अहवालासाठी मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.

अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका आणि कल्याण, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या तालुक्यांतील ग्रामीण भागांत होणाऱ्या करोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण आजही नगण्य आहे. अनेकदा रुग्णांच्या चाचण्या उशिराने झाल्याने आणि अहवाल येण्यास वेळ लागल्याने रुग्णावर पुरेसे उपचार करता येत नाहीत. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवल्याचे प्रकारही समोर आले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांसाठी आणि ग्रामीण भागासाठी पाच नव्या प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २ जुलै रोजी बदलापूर दौऱ्यावर असताना केली होती. त्यानंतरही अनेक दिवस या प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी हालचाली झाल्या नाहीत.

गेल्या आठवडय़ापासून या प्रयोगशाळांच्या निर्मितीसाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर महापालिका तसेच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी पाहणी करून आवश्यक ते स्थापत्य बदल करण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयोगशाळांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी दोन खासगी कंपन्यांना गेल्या आठवडय़ात पत्रव्यवहारही केला आहे. तसेच संबंधित कंपन्यांना तातडीने या यंत्रांचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले आहेत. येत्या आठवडाभरात ही यंत्रणा जिल्ह्यात दाखल होईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमधून प्रत्येकी दीड ते २ हजार चाचण्या दिवसाला होतील, अशी माहिती उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली आहे.