08 March 2021

News Flash

करोनाच्या जैविक कचऱ्याची लाट

वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघरमध्ये तीन महिन्यांत पाच पटीने वाढ

वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघरमध्ये तीन महिन्यांत पाच पटीने वाढ

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई :  करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंतेने सध्या सर्वानाच ग्रासले आहे. या रुग्णांवर उपचारादरम्यान होणाऱ्या वाढत्या जैववैद्यकीय कचऱ्याचीही या चिंतेमध्ये भर पडली आहे. जैववैद्यकीय कचऱ्याची लाट ही वसई-विरार, मीरा-भाईंदर व पालघरमध्येही आली असून दिवसाला सुमारे ५६५ किलो इतका जैववैद्यकीय कचरा येथे तयार होत आहे.  मागील तीन महिन्यांपासून त्यामध्ये पाच पटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

वसई-विरार, मीरा-भाईंदर तसेच पालघर जिल्ह्य़ांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.  या रुग्णांवर उपचार करताना हाताळण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याचा वापर झाल्यानंतर ते टाकून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असते. तसे न केल्यास त्यापासून धोका पोहोचण्याचा संभव असतो.

करोनाबाधितांच्या उपचारांसाठी ठिकठिकाणी रुग्णालयांबरोबर अलगीकरण के ंद्र, करोना उपचार के ंद्र तयार करण्यात आले आहे.  रुग्णांवरील उपचारादरम्यान रुग्णालय व करोना के ंद्रात मोठय़ा प्रमाणात जैविक कचरा तयार होऊ  लागला आहे.  हा कचरा इतर कचऱ्यांत न मिसळता त्याची विल्हेवाट लावण्यासाठी के ंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर राज्य मंडळाने  नियमावली तयार केलेली आहे. त्यानुसार विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. यासाठी वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका तसेच पालघर जिल्ह्य़ासाठी हे काम ‘टच एन ग्लो’ या पालघर येथील कंपनीला देण्यात आले आहे.  तीनही विभागांतील कचरा स्वतंत्रपणे उचलून पालघर येथे सोडियम क्लोराइडचा वापर करून इन्सनव्हेंट मशीनमध्ये टाकून त्याचे भस्मीकरण केले जात आहे. एप्रिलपासून या  शहरांतील   कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होऊ  लागली आहे. एप्रिल महिन्यात केवळ १०५ किलो प्रतिदिन इतका कचरा निघत होता.  मात्र दोन महिन्यांतच यामध्ये चार पटीने वाढ होऊन जून-जुलैमध्ये ५६५ किलो प्रतिदिन इतका जैविक कचरा जमा झाल्याची माहिती जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले आहे.

 

जैववैद्यकीय कचरा ( किलोमध्ये)

महिना     पालघर        वसई -विरार     मीरा-भाईंदर

एप्रिल        १७४              ३१५                 २६८१

मे               २०८             १५९९               ४४३४

जून            १५७७            ५२६५              ८५५५

जुलै चालू     ५६९              १६७३              १७१७

एकूण          २५२८            ८८५२              १७३८७

मीरा-भाईंदरमधून सर्वाधिक कचरा

मागील तीन महिन्यांपासून वसई-विरार, पालघर व मीरा-भाईंदरमधून आतापर्यंत साधारणपणे २८ हजार ८६७ किलो इतका जैववैद्यकीय कचरा गोळा  करण्यात आला आहे. यामध्ये पालघरमधून २ हजार ५२८ किलो, वसई-विरारमधून ८ हजार ८५२ किलो तर मीरा-भाईंदरमधून १७ हजार ३६७ किलो असा कचरा जमा झाला आहेत यात सर्वाधिक कचरा हा मीरा-भाईंदर शहरातून जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.

रुग्णांची संख्या व त्यावर उपचारातून निघणाऱ्या जैववैद्यकीय कचरा आमच्या संस्थेकडून पालघर, वसई, भाईंदर या तीनही विभागातून उचलला जात आहे. शास्त्रीय पद्धतीने त्याची तात्काळ विल्हेवाट लावली जात आहे. तसेच मागील जून आणि जुलै महिन्यात साधारणपणे चार ते पाच पट्टीने जैववैद्यकीय कचरा वाढला आहे.

-नीलेश पाटील, जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक पालघर

करोनाच्या  जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे काम शासन मान्यतेनुसार ‘टच अ‍ॅण्ड ग्लो’ कंपनीला देण्यात आले आहे. करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने कचऱ्यात वाढ होत आहे. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याने शहरातील नागिकांना कसलाच धोका नाही.

-डॉ तब्बसुम काझी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:12 am

Web Title: covid biomedical waste increased five times in three months zws 70
Next Stories
1 विसर्जनासाठी फिरते कृत्रिम तलाव तयार करा
2 अग्निशमन दलाचे कर्मचारी चार महिने पगाराविना
3 Coronavirus : आता वसईतही होणार करोना चाचणी
Just Now!
X