News Flash

ठाणे शहरातील रुग्णसंख्या स्थिर

दररोज सरासरी बाराशेच्या आसपास रुग्ण

दररोज सरासरी बाराशेच्या आसपास रुग्ण

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या महिनाभरापासून करोना उद्रेकाचे केंद्र ठरलेल्या घोडबंदर भागातील रुग्णसंख्या स्थिरावू लागली असून याचा परिणाम शहरातील एकूण रुग्णसंख्येवरही दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून पालिका हद्दीतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या सरासरी एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे. घोडबंदर परिसरातील दैनंदिन रुग्णसंख्याही कमी झाल्याने पालिका प्रशासनाने आता वागळे इस्टेट, लोकमान्यनगर तसेच अन्य दाट वस्त्यांमध्ये निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

राज्यभरात करोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख स्थिरतेकडे जात असताना गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील रुग्णसंख्येमध्येही घट होत असल्याचे चित्र आहे. टाळेबंदीमुळे शहरातील जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने ही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली असतात. त्यामुळे दुपारी किंवा रात्रीच्या वेळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम ठाणे शहरात दिसू लागला आहे, असा दावा महापालिका प्रशासनामार्फत केला जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडय़ाभरात म्हणजेच, १९ ते २५ एप्रिल या कालावधीत ८ हजार ६०७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दाट लोकवस्त्यांवर लक्ष

दाट लोकवस्ती असलेल्या वर्तकनगर तसेच लोकमान्यनगर भागातही रुग्णसंख्या दोनशेच्या आसपास आहे. नौपाडा-कोपरी भागात दररोज सरासरी १०० ते १२०, कळवा-खारेगाव पट्टय़ात १२५ ते १५० रुग्ण सापडत आहेत. हे प्रमाण घोडबंदरच्या तुलनेत कमी असून येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनामार्फत केला जात आहे. अतिशय दाटीवाटीच्या मुंब्रा परिसरात दररोज सरासरी २५ ते ३० रुग्ण सापडत आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढविण्यात आले आहे. तरीही हा आकडा कमी आहे असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

ठाणे शहरात कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील जीवनावश्यक दुकानांनाही वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:27 am

Web Title: covid cases in thane city stable zws 70
Next Stories
1 दीड वर्षांत लाचखोरीची ३३ प्रकरणे उघड
2 वैद्यकीय सुविधांबाबत २४ तास माहिती सेवा
3 स्मशानभूमीतील जळते सरण विझेना
Just Now!
X