टाटा आमंत्रा गृहसंकुलात १००० खाटांचे केंद्र उभारण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

आशिष धनगर, लोकसत्ता

ठाणे : ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणोली येथे एक हजार खाटांचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलाच्या आवारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच ही व्यवस्था उभी केली जात असून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे पोहचणे शक्य होणार आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा एक हजारांहून अधिक झाला आहे. ही बाब लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने १ हजार खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलातील अनेक इमारती रिकाम्या असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर शहरांतील करोना संशयीतांसाठी विलगीकरण कक्ष तयार केले होते. आता तिथे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात असली तरी आपत्कालीन परिस्थितीत एका सुसज्ज व्यवस्थेची उभारणी करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे एक हजार खाटांच्या या कोविड सेंटरची आखणी केली जात असून यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे