News Flash

कोविड रुग्णालयांच्या निर्मितीस दिरंगाई

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ४० दिवस पूर्ण

प्रतिनिधिक छायाचित्र

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला ४० दिवस पूर्ण

भाईंदर : मीरा-भाईंदरमधील करोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे १ हजार खाटा असलेले कोविड रुग्णालय उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले होते. परंतु ४० दिवस उलटले तरी अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून आलेल्या नाहीत.

मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या साडेपाच हजारांवर जाऊन पोहोचली आहे. शिवाय १९१ नागरिकांचा करोनामुळे बळी गेला आहे. शहरातील रुग्णवाढीची संख्या १५० ते १६० झाली आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन उपचार करणे महत्त्वाचे आहे. परंतु मीरा-भाईंदर शहरात रुग्णालय तसेच विलगीकरण केंद्राची कमतरता भासत  आहे. शिवाय असलेल्या रुग्णालयात आणि विलगीकरण केंद्रात अपुऱ्या सामुग्रीमुळे रुग्णांना हाल सहन करावे लागत होते. त्यामुळे ३१ मे रोजी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ हजार खाटा क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारण्याची मान्यता दिली होती. परंतु ४० दिवस उलटले असले तरी अद्याप पालिका प्रशासनाकडून कामास सुरुवात झालेली नसल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून पूर्वी करोना रुग्णालय उभारण्याकरिता महापालिकेच्या वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र वाहनतळाची उंची कमी असल्याने म्हाडाकडून या ठिकाणी रुग्णालय उभारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर घोडबंदर येथील आरक्षण क्रमांक ३०२ च्या जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या जागेतही बदल करून मनपा आयुक्तांनी भाईंदरच्या राधास्वामी सत्संगच्या जागेला शेड व संरक्षण भिंत असल्याने मान्यता देण्यात आली. या जागेतदेखील बदल करून भाईंदरच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानावर करोना रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी मे महिन्यात रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली असली तरी मागील एक महिन्यात जागादेखील निश्चित करण्यात आलेले नाही. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध नसताना महापालिकेने कमी वेळात रुग्णालय उभारणे गरजेचे होते. परंतु तशा हालचालीदेखील होत नसल्यामुळे पालिका आयुक्त दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

रुग्णालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून त्या संदर्भात निविदादेखील प्रसिद्ध केली आहे. लवकरच सर्व आवश्यक बाबी पुर्ण करून रुग्णालयाची निर्मिती होईल.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 3:13 am

Web Title: covid hospitals construction delay in mira bhayandar city zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये टाळेबंदीचा फज्जा
2 वसईत दूषित पाण्याचे संकट
3 हॉटेलांतील अलगीकरणाचा निर्णय रद्द
Just Now!
X