उल्हासनगरातही रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा

अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोना बाधितांच्या संख्येचा उतरता आलेख पाहायला मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत नव्या आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १००च्या आत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. शेजारच्या उल्हासनगर शहरातील करोना रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून शंभरीच्या खाली असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची तिन्ही शहरांतील संख्याही मर्यादित आहे.

गेला आठवडा बदलापुरातल्या कडक टाळेबंदीच्या विषयामुळे गाजला. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक टाळेबंदीची गरज असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी सांगितल्याने पालिका प्रशासनानेही कधी नव्हे ती वायुवेगाने कृती करत अधिकच्या टाळेबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. तीनच दिवसांत शहरात कडक टाळेबंदीची गरज नसल्याचा साक्षात्कार झाल्याने टाळेबंदी मागे घेतली गेली. मात्र या टाळेबंदीच्या घोषणेपूर्वीच काही दिवसांपासून बदलापूर शहरातील करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले होते. एप्रिल महिन्यतात २०० च्या पार असलेली बाधितांची संख्या आता ५० पर्यंत येऊन पोहोचली आहे. मंगळवारी बदलापुरात अवघ्या ५६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या १९ हजार ६८७ वर पोहोचली आहे. शहरात ८ मेपासून रुग्णसंख्या वाढ कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्याने शहरातील बहुतांश रुग्णालये रिकामी होऊ  लागली आहेत. शेजारच्या अंबरनाथ शहरातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. अंबरनाथ शहरात मंगळवारी अवघे ४३ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहराची एकूण रुग्णसंख्या १८ हजार ५८४ पर्यंत येऊन ठेपली आहे. अंबरनाथ शहरात गेल्या १० दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख उतरता झाल्याचे दिसून आले आहे. शहरात ३ मे रोजी शंभरीच्या खाली रुग्ण आढळले. त्यानंतर रुग्णवाढ ६ मे रोजी ११० इतकी होती. त्यानंतर रुग्णवाढ कमी झाल्याचे दिसते आहे. शहरात आतापर्यंत १७ हजार ३७४ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांत रुग्णसंख्येचा उतरता आलेख दिलासादायक असल्याचे बोलले जाते आहे.

उल्हासनगर शहरातही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहरात १ मे रोजी १०० रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकदाही ही संख्या शंभरीपार गेलेली नाही. मंगळवारी शहरात ६९ रुग्णांची नोंद झाली. तर ९ मे रोजी सर्वात कमी म्हणजे अवघे ३४ रुग्ण आढळले होते. शहरात आतापर्यंत १९ हजार ५२१ रुग्णांची नोंद झाली असून त्यात ४४९ जणांना मृत्यू झाला आहे. तर १८ हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

बदलापुरात खाटा रिकाम्या

रुग्णसंख्या वाढण्याच्या भीतीने टाळेबंदीची घोषणा केली जात असताना शहरातील रुग्णालयांमध्ये ३५ ते ४० टक्के खाटा रिकाम्या असल्याचे समोर आले होते. सध्या विविध रुग्णालयांत कोविड रुग्णालय आणि आरोग्य केंद्र प्रकारातील ३४० खाटा रिकाम्या असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. तर काळजी केंद्रांत ३७८ खाटा रिकाम्या आहेत.

मृत्यूदरही कमी

ब्रेक द चेन या नव्या टाळेबंदी नियमांमुळे अनेक गोष्टींमध्ये सूट मिळत असली तरी सकाळी ११ नंतर नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आल्याने संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे या तिन्ही पालिकांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधितांचा दर कमी झाला आहे. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक असल्याने रुग्ण उपचारासाठी बाहेर पडत असून त्यामुळे मृत्युदर कमी झाल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगितले जाते आहे.