इंजेक्शन टोचून गाय बेशुद्ध करून त्या गाईची चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार बदलापुरात उघडकीस आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी धडक कारवाई करताच चोरलेली गायीसह कार सोडून चोरटय़ांनी पळ काढल्याने ते हाती लागू शकले नाहीत. मात्र अशा प्रकारची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. मात्र इंजेक्शन टोचून गाय चोरून नेण्याच्या या नव्या पद्धतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बदलापूर गावात शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास एका मारुती एस्टीम कारमधून एक गाय चोरून नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी चोरटय़ांचा पाठलाग सुरू केला. त्याची कुणकुण लागताच त्यांनी कार बदलापूर गावातील हनुमान मंदिरजवळच्या गल्लीतील अरुंद रस्त्यावर नेत अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. चोरटय़ांनी एस्टिम कारमधील मागची सीट काढून त्या जागेत एका जिवंत गायीला कोंबून बसवले होते. तत्पूर्वी त्या गायीला कोणतेतरी औषध इंजेक्शनमधून टोचण्यात आले होते. पोलिसांनी कारसह कारमधील गाय, इंजेक्शन, इंजेक्शनची सुई तसेच औषधाची छोटी बाटलीही यावेळी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीण भागात गाय चोरण्याचा घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरामुळे अशा प्रकारे गायी चोरण्याची एखादी टोळीही सक्रिय असल्याचे समोर आले आहे.