ठाणे शहरातील रस्त्यांवर गल्लाभरूंच्या संख्येत वाढ
भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक जेरीस आलेले असताना त्यात आता गायी-वासरांना सोबत घेऊन त्याआधारे स्वत:चा खिसा भरू पाहणाऱ्यांचाही शहरात संख्या वाढल्याचे चित्र आहे. पैसे उकळण्यासाठी काही जण हा उद्योग करीत असून त्यासाठी गायी-वासरांना उपाशी ठेवले जात आहे.
एखादी गाय अथवा वासरू समोर आले त्यांना काही ना काही खायला घालण्याची लोकांची प्रवृत्ती असते. याच भावनेतून शहरातली मंडळी गायीला पेंढा, चारा, गुळ खोबरे असे खाद्य पदार्थ देतात. अनेकदा शिळे अन्नही गायीपुढे टाकले जाते. मात्र अशाप्रकारच्या भूतदयेमुळे गायींचे आरोग्य धोक्यात येते, याची सर्वसामान्यांना अजिबात कल्पना नसते. लोकांच्या याच भूतदयेचा गैरफायदा घेत काही भामटे गायवासरांना पुढे करून त्यांची लूट करीत असतात. गाय-वासरू घेऊन येणाऱ्या लोकांच्या हाती श्रद्धाळू लोक काही दक्षणा ठेवतात.
शिळया अन्नामुळे या गायींना मोठय़ा प्रमाणावर अतिसाराची लागण होते. अनेकदा गाय घेऊन फिरणाऱ्या इसमाकडून लोक
गोमुत्र विकत घेतात. आपण दिलेले अन्न गाईने खाल्ले, याबद्दल श्रद्धाळू लोकांना समाधान वाटते. मात्र त्यासाठी त्या गायीला रात्रभर उपाशी ठेवले जाते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी या गायी समोर येईल, ते आधाशीपणे खातात. मात्र त्याचा त्यांना खूप त्रास होतो.
कित्येकदा त्या गायींना ऊन-पावसात, थंडीत रस्त्यावर, पदपथांवर उभे करून ठेवले जाते. शेण आणि मूत्राची सर्वत्र दरुगधी पसरलेली असते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गोरक्षकांना गायींचे हे हाल दिसत नाहीत का, असा प्रश्न ठाण्यातील काही संवेदनशील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मंदिरालगत, रस्त्याच्या शेजारी, पदपथांवर गायी वासरांना घेऊन अनेकजण बसलेले असतात. त्यांना कुणीही हटकत नाही. मुळात शहरात मोकाट फिरणाऱ्या या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडे कोणताही विशिष्ट विभाग नाही.
खरेतर अशा प्रकारचे प्राणी बाळगायचे असतील, तर त्या व्यक्तीकडे महाराष्ट्र नागरी अधिनियमानुसार परवाना असणे आवश्यक आहे. मात्र सर्रास गाय आणि वासरू घेऊन येणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतो.
नवा गोरखधंदा
ग्रामीण भागातून गायी भाडय़ाने घेऊन शहरात फिरविण्याचा एक नवा व्यवसाय सध्या बोकाळला आहे. त्यात परप्रांतीय मंडळी अधिक कार्यरत आहेत.
शहरी भागात फिरणाऱ्या गायींचे हाल पाहवत नाहीत. ही जनावरे रस्त्यावर विनापरवाना फिरतात. दोरीने अथवा साखळदंडाने त्यांना बांधून ठेवले जाते. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच शिळे अन्न त्यांना जबरदस्तीने खाऊ घातल्यामुळे ते आजारी पडण्याची शक्यता असते. पदपथावर मंदिराबाहेर तसेच रस्त्यावर त्यांची शेण आणि मूत्र पसरल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते.
– शकुंतला मुजूमदार, प्राणिमित्रf
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 3:22 am