ट्विटर, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे तरुणाईला अभिव्यक्त होण्यासाठी प्रचंड व्यासपीठ मिळू लागले आहे. त्यावरून आपले विचार, मते, भूमिका मांडण्यात तरुणवर्ग नेहमीच आघाडीवर आहे, पण तरुणवर्गाची ‘क्रिएटिव्हिटी’ किंवा सर्जनशीलता केवळ यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. स्वत:ला अभिव्यक्त होण्यासाठी ही मंडळी दृकश्राव्य माध्यमांचाही पुरेपूर वापर करताना दिसतात. तंत्रज्ञानातील प्रगती आणि सहज उपलब्धता यांमुळे त्यांना साधने उपलब्ध झाली आहेतच; शिवाय ठरावीक चौकटीबाहेर विचार आणि कृती करण्याची वाढती तळमळही त्यांना नवनिर्मितीकडे आकर्षित करत आहेत. त्यातूनच लघुपट, माहितीपट, संगीतबॅण्ड यांची निर्मिती अधिक झपाटय़ाने घडत आहे. अर्थात, हे सर्व करताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सृजनतेचा ध्यास घेऊन अडथळय़ांची शर्यत ओलांडत पुढे पुढे जाणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नांची कहाणी सांगणारे हे पाक्षिक सदर..
चित्रपट सुरू असताना निर्मात्याने पैसे दिले नाहीत म्हणून चित्रपट बंद करण्याची वेळ दिग्दर्शकावर आल्याच्या अनेक कथा चित्रपट क्षेत्रात चर्चिल्या जातात. मात्र असाच प्रसंग ठाण्यातील एका नवोदित लघुपट दिग्दर्शकावर आल्याने त्याचे अवसान गळाले होते. मात्र या परिस्थितीमध्येही आपले काम सुरू ठेवत या तरुण दिग्दर्शकाने पदरमोड करत लघुपट पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. या उपक्रमामध्ये त्याच्या सोबत असलेल्या सगळ्या मित्रांनी या उपक्रमासाठी अर्थिक पाठबळ उभे केले. या सगळ्यांच्या प्रयत्नातून अभिजीत सोनावणे याचा ‘इग्नोरंट पेट्रीयट्स’ हा लघुपट पूर्ण झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला सगळ्याच स्थरांतून कौतुकाची थाप मिळाली. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या लघुपटाने पुरस्कार जिंकण्याची किमया केली. अभिजीतच्या लघुपट निर्मितीचा ध्यास यानिमित्ताने वाढत जाऊन आता दोन तासांचा चित्रपट तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. ही कथा आहे ‘फ्लॅशबॅक प्रोडक्शन’ या लघुपट निर्माण करणाऱ्या संस्थेची..
आपल्या दृष्टीतून जगाला काहीतरी दाखवण्याची खुमखुमी प्रत्येक तरुणाला असते. तशीच खुमखुमी ठाण्यातील अभिजीत सोनावणे या तरुणालाही होती. त्यातच लहानपणापासून चित्रपटाचे भयंकर आकर्षण त्यामुळे याच क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास त्याने घेतला होता. चित्रपट क्षेत्रातील ज्ञान मिळावे या उद्देशाने त्याने ‘जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट्स’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हे प्रशिक्षण घेत असतानाच स्वत:चा सिनेमा बनवण्याचा निर्णय त्याने घेतला, पण चित्रपट उभा करण्यासाठी लागणारा आर्थिक खर्च व चित्रपट बनवण्याचा अनुभव त्याच्याकडे नसल्यामुळे ते करणे अडचणीचे होत होते. त्या वेळी निशांत या मित्राने या उपक्रमामध्ये सहभागी होत मदत करण्याचे आश्वासन दिले. निशांतसह मनोज, जान्हवी, अमित, उदय, हरिदास अशा अनेक मित्र-मैत्रिणींची जुळवाजुळाव करून ‘फ्लॅशबॅक प्रोडक्शन’ची सुरुवात झाली. लघुपट करण्याचे ठरल्यानंतर अभिजीतने या लघुपटाची कथा लिहिण्याचा व ते दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. लेखक आणि दिग्दर्शकाची गरज पूर्ण झाली असली तरी चित्रपटासाठी उत्तम कॅमेरामन आणि कार्यकारी निर्मात्याचीही गरजेचा होता. तसेच या चित्रपटासाठी आवश्यक कलाकार मुलांचीही गरज होती. या वेळी निशांत याने कॅमेरामनची आणि अमित याने कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उचलली. मुंबईमधील वेगवेगळ्या झोपडपट्टय़ांमध्ये ७०-८० निवड चाचण्या (ऑडिशन्स) घेऊन कलाकार मुलांची निवड करण्यात आली. लघुपट तयार करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती. मात्र चित्रपटाला निर्माता नसल्याने पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न होता. अनेक निर्मात्यांचे उंबरे झिजवल्यानंतर एका निर्मात्याने या उपक्रमाला अर्थिक बळ देण्याचे ठरवले आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली.
आर्थिक पाठबळ मिळाल्याने कलाकारांचा उत्साह वाढला. संपूर्ण चमूच्या कामाचा वेग वाढला, पण अचानक निर्मात्याने पुढचे पैसे देण्यास इन्कार केला आणि या चमूवर आकाश कोसळले. पदरी पैसाच नसेल तर पुढची सोंगे करायची तरी कशी, या विवंचनेने सारेच भांबावून गेले. चित्रीकरण तर साफ बंद झाले. इतके दिवस कसून केलेल्या मेहनतीवर अध्र्यातच पाणी पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. डोक्यातला विषय आणि आतापर्यंतचे श्रम या मंडळींना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे आता आपणच आपल्या खर्चाने उर्वरित लघुपट पूर्ण करण्याचा निर्धार सगळ्यांनी केला. हे म्हणावं तितकं सोपं नव्हतं, पण तरीही सगळी मंडळी नव्या जोमाने कामाला लागली. एक लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी ‘इग्नोरंट पेट्रीयट्स’ पूर्ण केला. केवळ मेहनतच नव्हे तर पदरमोड करून तयार केलेल्या लघुपटाच्या पूर्णत्वाचा आनंद सर्व कष्ट विसरायला लावणारा होता, पण ‘चेरी ऑन द केक’ म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या या मेहनतीवर समीक्षकांनीही पसंतीचे शिक्कामोर्तब केले. पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये लघुपटांच्या श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. तर आरंभ लघुचित्रपट स्पर्धेत सगळ्या परीक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या या लघुपटाला ‘ज्यूरी अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
पहिल्याच प्रयोगाला मिळालेल्या या यशामुळे ‘फ्लॅशबॅक प्रोडक्शन’चे सदस्य प्रचंड खूश असून लवकरच रसिकांसाठी नवा चित्रपट घेऊन येण्याचा विडा या तरुणांनी उचलला आहे. त्यातूनच ‘जनरल वर्ड’ नावाची नवीन फीचर फिल्म बनवण्याच्या तयारीला ही मंडळी लागली आहेत. त्यासाठी लागणारा खर्च सुमारे सव्वा कोटी इतका मोठा आहे.

दहशतवादाचे विदारक चित्र
‘इग्नोरंट पेट्रीयट्स’ या लघुचित्रपटाच्या माध्यमातून दहशतवादाचे बळी ठरणाऱ्या समाजाचे चित्रण करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी एका अतिरेक्याला बॉम्ब असलेला जेवणाचा डबा गाडीत ठेवण्याची जबाबदारी दिली जाते, या दृश्यापासून ‘इग्नोरंट पेट्रियट्स’ सुरू होतो. अतिरेकी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे लोकलगाडीच्या सीटखाली डबा ठेवतो, पण तितक्यात त्याच्या शेजारी एक डबेवाला येऊन बसतो. एकाच रंगाच्या डब्यामुळे गोंधळ उडतो आणि डबेवाला बॉम्ब असलेला डबा घेऊन गाडीतून उतरतो. ही गोष्ट अतिरेक्याच्या लक्षात येते आणि तोही गाडीतून उतरून डबेवाल्याचा पाठलाग करू लागतो. रेल्वेफलाटावरील गर्दीत डबेवाला दिसेनासा होतो. तरीही अतिरेक्याची शोधाशोध सुरूच राहते. अखेर त्याला एका इमारतीच्या खाली हा डबेवाला आणि त्याची डब्यांनी भरलेली सायकल दिसते. डबेवाला इमारतीत गेल्याचे पाहताच तो सायकलीजवळ धाव घेऊन ‘स्वत:चा’ डबा शोधण्यास सुरुवात करतो, पण ‘तो’ डबा तेथे नसतोच. हा डबा नेमका कुठे जातो? त्या डब्यात नेमके काय असते? या सगळ्याची उत्तरे आपल्याला ‘इग्नोरंट पेट्रीयट्स’ या लघुपटाच्या शेवटी मिळतात. लघुपट संपतो तेव्हा समोर बसलेल्या हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दहशतवादाचे भयाण चित्र उभे राहते.