घोडबंदर येथील गायमुख भागातील खाडीकिनारी जागा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर  खाडी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम मार्च २०१७ मध्ये तर दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या वर्षभरात पुर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी दहा कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र मिळणार आहे. मुंब्रा येथील पारसिक रेतीबंदर खाडीकिनारी भागात चार किमी लांबीचा आणि ४२ एकर जागेत सिंगापूर व साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी ७५ कोटींची निविदा मागविण्यात आली असून या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

या प्रकल्पामुळे शहरात मोठे पर्यटन केंद्र उभे राहणार असून त्यामुळे शहराला नवी ओळख प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे गायमुख, नागलाबंदर, कोलशेत आणि बाळकुम येथे चौपाटी विकसित करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले असून त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

क्लॉक टॉवर आणि राष्ट्रध्वज

लंडनच्या धर्तीवर ठाणे शहरातील गोल्डन डाईज नाका भागात क्लॉक टॉवर उभारण्याचे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील महत्वाच्या भागात म्हणजेच मासुंदा तलाव, उपवन तलाव, माजीवाडा जंक्शन किंवा अन्य ठिकाणी मोठय़ा उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे शहाराला नवी ओळख प्राप्त होणार आहे.

जलवाहतूक प्रकल्प

ठाणे शहराला ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा लाभला असून या खाडीमध्ये जलवाहतूकीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात वसई, मीरा-भाईंदर, ठाणे, कोलशेत, घोडबंदर, साकेत, दिवा, भिवंडी, कल्याण या भागात ४५ किमी लांबीचा ७० मिनीटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून त्यासाठी २८७.९५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात साकेत ते बेलापूर या ठिकाणी जलवाहतूक प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये ९.५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

स्मार्ट पार्किंग योजना

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासोबतच मोबाईल आणि वेबबेस अ‍ॅप्लीकेशनची सुविधा दिली जाणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना जवळपास कोणत्या ठिकाणी वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि त्याचे दर किती आहेत, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच वाहन तळाचे शुल्क भरण्यासाठी नागरिकांना ऑनलाईनद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, वाहनतळाच्या ठिकाणी सेंसर व पार्किंग मीटर बसविण्यात येणार आहेत. यामुळे ठाणेकरांना स्मार्ट पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अनुकूल रहदारी व्यवस्थापन प्रणाली

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने विविध योजना हाती घेतल्या असून त्यामध्ये परदेशी शहरांच्या धर्तीवर ‘अनुकूल रहदारी व्यवस्थापन प्रणाली’ राबविण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नल यंत्रणेचा वेळ नियंत्रित करून वेळेची बचत करण्यात येणार आहे. ‘गुगल’ या कंपनीच्या ‘गुगल सॅटलाइट’वर आधारित ही प्रणाली असणार आहे. त्यामुळे या योजनेच्या पाश्र्वभूमीवर गुगल कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा सुरू असून अशी प्रणाली राबविण्यामध्ये ठाणे हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.

वाहतूक प्रकल्प..

ठाणे पुर्व रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक सुधारणा प्रकल्प – २ राबविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा खर्च सुमारे २६६ कोटी रुपये इतका आहे. या प्रकल्पामुळे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या तीन हात नाका भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘ग्रेड सेपरेटर’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

पुलांची कामे..

ठाणे तसेच कळवा शहराला जोडण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारणीचे काम सुरू आहे. मुख्य पुल व त्याच्या दोन मार्गिका मार्च २०१८ पर्यंत वाहतूकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. या कामासाठी ४० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक मार्गावरील ठाणे व मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कोपरी पुल अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी पुलाच्या रुंदीकरणाचे काम लवकर सुरू व्हावे म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे महापालिका पाठपुरावा करणार आहे. ठाणे शहरातील मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा चौक व संत नामदेव चौक या तीन उड्डाण पुलांची कामे डिसेंबर २०१७ पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. कल्याण फाटा व शीळफाटा येथील उड्डाण पुलाचे काम दोन ते तीन महिन्यात पुर्ण होईल.