जुन्या लोकलमधून आणलेल्या दगडमातीचा दिव्यात भराव; तिवरांचे अस्तित्व धोक्यात

आशीष धनगर, ठाणे</strong>

अनधिकृत बांधकामाचे आगार असलेल्या दिवा शहरातील खाडीकिनाऱ्यांलगत भराव टाकून बेकायदा बांधकामे होत असतानाच, आता मध्य रेल्वेही खाडी बुजवण्याच्या कामाला लागल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेत रेल्वेच्या जुन्या गाडय़ांतून मोठय़ा प्रमाणात बांधकामाचा राडारोडा वाहून आणून खाडीकिनारी टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरातील तिवरे धोक्यात आली आहेत. मध्य रेल्वेमार्गावर सुरू असलेल्या विविध विकासकामांतून निर्माण होत असलेला हा बांधकाम कचरा असल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या मुंब्रा, दिवा भागात दिवसेंदिवस खाडी किनाऱ्याची नासधूस होत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा भागात खाडी किनाऱ्यावर भराव टाकून यापूर्वी हजारोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. बेकायदा बांधकामे उभी करणारे माफियांचे एक मोठे जाळे या संपूर्ण पट्टय़ात विणले जात असताना रेल्वेसारख्या प्रशासकीय यंत्रणांकडूनच खाडी किनारी राडारोडय़ाचे ढीग टाकले जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे स्थानकांच्या पुनर्बाधणीच्या कामानंतर मोठय़ा प्रमाणावर बांधकामाचा राडारोडा तयार होतो. हा सर्व राडारोडा एका जुन्या उपनगरीय लोकल गाडीत भरण्यात येतो. त्यानंतर रात्रीच्या वेळी उपनगरीय रेल्वेची वाहतूक बंद असताना हा राडारोडा भरलेली उपनगरीय लोकल गाडी खाडीकिनारी उभी करून तेथे हा सर्व राडारोडा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून टाकण्यात येतो. या राडारोडय़ात सिमेंट, सफेद चुना, भिंतीना लावण्यात आलेले रंग सर्व खाडीच्या पाण्यात मिसळत असल्याचे दिसून येत आहे. दिवा रेल्वे स्थानक ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान साधारण दोन किलोमीटरचा खाडी किनारा आहे. खाडीकिनारी टाकण्यात येणाऱ्या या राडारोडय़ाचा आवाका इतका मोठा आहे की या ठिकाणच्या खाडी किनाऱ्याजवळील कांदळवन राडारोडय़ांनी आच्छादलेले दिसून आले आहे.

खाडीच्या प्रवाहात अडथळा

सध्या मध्य रेल्वेतर्फे  ठाणे ते दिवा परिसरात पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या उपनगरीय लोकल मार्गावर मुंब्रा आणि दिव्याच्या दरम्यान दोन ठिकाणी खाडीवर पूल उभारण्यात आले आहेत. या पुलाच्या बांधणीसाठी खाडीच्या पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला होता. मात्र या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाले असूनही पाण्याच्या प्रवाहात टाकलेल्या मातीची भर रेल्वेकडून काढण्यात आलेली नाही. पावसाळ्यात मलंगगडाच्या डोंगरावरून पाण्याचा प्रवाह थेट या खाडीत येतो. पावसाळा सुरू होण्याअगोदर हा प्रवाह मोकळा झाला नाही तर दिवा भागात पाणी तुंबण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

दिवा रेल्वे स्थानक ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या खाडीकिनारी रेल्वेतर्फे सर्रासपणे राडारोडा टाकण्यात येत आहे. यामुळे खाडी किनाऱ्याचे प्रदूषण होत असून कांदळवनाला धोका पोहोचत आहे. खाडी प्रदूषणाकडे रेल्वेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

-विजय भोईर संस्थापक, ‘जागा हो दिवेकर’ सामाजिक संस्था  

दिवा रेल्वे स्थानक ते कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान खाडी किनाऱ्याला लागूनच रेल्वे रूळ आहेत. त्यामुळे या राडारोडय़ाने तेथील अंतर मिटवण्यासाठी आणि जागा भक्कम होण्यासाठी मदत होत आहे.

-अनिल कुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे