शहरात उभारण्यात येणाऱ्या तीन पादचारी पुलांच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपांचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे गटनेते मनोहर डुम्बरे यांच्या पालिकेतील कार्यालयात शिरून त्यांना घेराव घातला होता. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर पालिका मुख्यालयात झालेल्या या गर्दीप्रकरणी प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना सेवेतून तात्काळ कमी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

ठाणे शहरात १३ कोटी रुपये खर्चून तीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील यापूर्वी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलांचा नागरिकांकडून वापर होत नसल्याचे सांगत नव्या पुलांच्या कामांना मनोहर डुम्बरे यांनी विरोध केला होता. केवळ निवडणूक निधी जमविण्यासाठी शिवसेनेकडून पूल उभारण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेतील भाजप गटनेता कार्यालयात डुम्बरे यांना घेराव घातला होता. या आंदोलनानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन करोनाकाळात झुंडीने घेराव घालणाऱ्या शिवसेना  कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मीनल संखे, साधना जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, शिवसैनिक राजू फाटक यांच्याबरोबरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.