05 June 2020

News Flash

डोंबिवलीत करोनाबाधित रुग्णावर गुन्हा

बंदी आदेश असताना लग्न, हळदीचे कार्यक्रम करणाऱ्या शेलार, भोईर कुटुंबीयांवर कारवाई

(संग्रहित छायाचित्र)

 

करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाने डोंबिवलीत नातेवाईकाच्या  हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलिसांनी शनिवारी हा गुन्हा दाखल केला.

संसर्गजन्य, महामारी आजार प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम २, ३, ४ अन्वये शासकीय आदेशाचे भंग करणारी  सर्व कलमे या रुग्णाला लावण्यात आली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

करोना विषाणूची बाधा झालेला रामनगर पोलीस हद्दीतील एक तरुण तुर्कीतून आला होता. करोना विषाणूचा फैलाव झाला असल्याने त्याने घरी आल्यानंतर स्वत:ला कुटुंबापासून वेगळे ठेवणे आवश्यक होते. तो आपल्या नातेवाईकाच्या हळदी, लग्न कार्यक्रमात सहभागी झाला होता, असे राऊत यांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व सार्वजनिक ठिकाणचे सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी १४ मार्च रोजी रद्द केले होते. हे माहिती असताना शेलार कुटुंबीयांनी डोंबिवली पूर्वेतील बी. आर. मढवी मैदानावर हळदी समारंभाचा जाहीर कार्यक्रम करून शासन आदेशाचा भंग केला म्हणून विजय शनिकुमार शेलार, तुषार विजय शेलार, कुणाल विजय शेलार, संपती विजय शेलार या संयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कार्यक्रमासाठी मैदान उपलब्ध करून दिले म्हणून जमीन मालक एकनाथ मढवी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्व प्रकारचे कार्यक्रम करण्यास बंदी असताना जुनी डोंबिवलीतील टेलकोसवाडीतील भोईर कुटुंबीयांनी दिवा-वसई रेल्वे मार्गाजवळील जुनी डोंबिवलीतील मैदानावर शेलार-भोईर कुटुंबीयांचा विवाह सोहळा आयोजित केला म्हणून अशोक लक्ष्मण भोईर, भगवती अशोक भोईर, हर्षदा अशोक भोईर, शीतल मुरलीधर भोईर यांच्याविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालिकेचे आवाहन

जुनी डोंबिवलीतील मैदानावर झालेल्या विवाह सोहळ्यास आणि हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नातेवाईक, नागरिकांनी स्वत:ला कुटुंबापासून १४ दिवस अलग ठेवावे. होम विलगीकरणाचे सर्व शासकीय आदेश पाळावेत. आजारसदृश लक्षणे दिसल्यास तातडीने पालिका रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 12:47 am

Web Title: crime against a crippled coronary patient abn 97
Next Stories
1 Coronavirus: मनसेच्या एकमेव आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
2 Coronavirus: …आणि त्या तरुणामुळे कल्याण-डोंबिवलीच्या महापौरच १४ दिवसांसाठी झाल्या होम क्वॉरंटाइन
3 वसईत करोनाचे ३ रुग्ण, एकूण संख्या ५ वर
Just Now!
X