ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरला अटक

ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून दीड लाख रुपये घेणाऱ्या डॉक्टरसह पाच जणांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. परवेझ शेख, डॉ. नाझनीन, मोहम्मद अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी डॉ. परवेझला अटक केली आहे. तो ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता खाटांचा प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच त्याने गुरुवारी पहाटे अशाच प्रकारे आणखी एका महिलेला कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण न करता अतिदक्षता विभागात दाखल केल्याचेही समोर येत आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या वडिलांना करोनाची लागण झाली होती. गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या तरुणाने त्याच्या वडिलांना अंधेरी येथील एका रुग्णालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी खाटा रिकाम्या नव्हत्या. त्यावेळी तेथील रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने तरुणाला एक मोबाईल क्रमांक दिला. हा मोबाईल क्रमांक मोहम्मद आबिद खान याचा होता. तरुणाने या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ग्लोबल रुग्णालयात खाटेची व्यवस्था होईल. मात्र, त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे मोहम्मदने सांगितले. तरुणाच्या वडिलांची प्रकृती नाजूक असल्याने तो पैसे भरण्यास तयार झाला. पैसे दिल्यानंतर तरुणाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुण घरी आल्यानंतर ग्लोबल रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने याची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांना दिली. तसेच तरुणाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडेही तक्रार दिली होती. महापौर नरेश म्हस्के यांनीही याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील इतर डॉक्टरांची चौकशी केली. त्यावेळी तेथील डॉक्टरांच्या चौकशीत डॉ. परवेझ याने अतिदक्षता विभागातील एक खाट तरुणाच्या वडिलांसाठी रिक्त ठेवली होती, अशी माहिती मिळाली. तसेच रुग्णालयातील डॉ. नाझनीन यांच्या सहकार्याने डॉ. परवेझ याने कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता आणखी एका रुग्णाला अशाच प्रकारे रुग्णालयात दाखल केल्याचे चौकशीत उघड झाले. याप्रकरणी डॉ. परवेझ याला अटक केली आहे.