18 January 2019

News Flash

गणेश कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

नगरसेवक गणेश कांबळे याने मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी कॅरलीन यांनी केला होता.

शिवसेनेचे कळवा येथील नगरसेवक गणेश कांबळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे.

ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या त्याच्या पत्नी कॅरलीन यांच्याकडे कळवा पोलिसांनी लग्नाचे प्रमाणपत्र मागितल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ या सहदैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी सकाळी कॅरलीन हिच्यासोबत ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच नगरसेवक कांबळे याने कळव्यातील शासकीय जमिनींवर बेकायदा घरे बांधून त्याची विक्री केल्याचे पुरावेही त्यांनी यावेळी सादर केले. या प्रकरणी आयुक्त सिंग यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश दिल्यामुळे कांबळे याचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

नगरसेवक गणेश कांबळे याने मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी कॅरलीन यांनी केला होता. या मारहाणीनंतर त्या तक्रार नोंदविण्यासाठी कळवा पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, कांबळे याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाच्या प्रमाणपत्राची मागणी केल्याचा आरोप कॅरलीन यांनी केला होता. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’ या सहदैनिकामध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. कांबळे याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करावा आणि या गुन्ह्यात त्याला तात्काळ अटक करावी. तसेच कळव्यातील शासकीय जमिनींवर अतिक्रमण करून त्याची विक्री केल्याचे पुरावे आयुक्तांकडे दिले असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याने त्याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याआधारे त्याच्यावरच लवकर तडिपारीची कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त सिंग यांच्याकडे केल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सिंग यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश कळवा पोलिसांना दूरध्वनीवरून दिल्याचे वाघ यांनी सांगितले. सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळण्याचे आदेश द्यावेत; जेणेकरून न्यायासाठी महिलांना पोलीस आयुक्तांपर्यंत दाद मागण्याची वेळ येणार नाही, याबाबतही आयुक्तांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून या विभागासाठी रणजीत पाटील आणि दीपक केसरकर असे दोन गृहराज्यमंत्री आहेत. मात्र, महिला अत्याचाराचे गुन्हे घडत असतानाही गृह विभागाकडून कोणतीच दखल घेताना दिसून येत नाही. मुंबईला खेटून असलेल्या ठाण्यातील या प्रकरणामध्येही तेच पाहायला मिळत आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्याचा महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे त्यांना अशा प्रकरणाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने महिला आयोग आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

First Published on February 9, 2018 12:57 am

Web Title: crime against ganesh kamble tmc shiv sena corporator