ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांच्याविरोधात मंगळवारी प्रशासनाने एमआरटीपी कायद्यांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात दाखल केला असून या गुन्ह्य़ामुळे पाटणकर हे अडचणीत आले आहेत. तसेच या गुन्ह्य़ामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी वृंदावन भागातील प्राईड पॅराडाईज या इमारतीत एकाच मजल्यावर दोन घरे खरेदी केली होती. या दोन्ही घरांच्या मधोमध असलेली भिंत काढून त्यांनी त्याचे एकाच घरात रूपांतर केले होते. याच कारणास्तव त्यांच्यावर राबोडी पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही सर्वसाधारण सभांमध्ये विविध प्रस्तावांवरून मिलिंद पाटणकर आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या खडाजंगी होत आहे. असे असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे मनमानी करत असल्याचा आरोप करत पाटणकर यांनी मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची सूचना मांडली होती. यातूनच हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

ठाणे आयुक्तांवर आरोप

सभा तहकुबीच्या सूचनेमध्ये आयुक्तांसंबंधी मांडलेले मुद्दे हे त्यांनीच माझ्याविरोधात गुन्हा दाखल करून सिद्ध केले आहेत, अशी प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. २०१३ मध्ये त्यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. त्तसेच शहरातील अशा जुन्या सर्वच प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.