कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत रोहिदासवाडा प्रभागातील ‘एमआयएम’च्या उमेदवाराचा प्रचार करताना एमआयएमचा नेता जावेद डोन यांनी धार्मिक आधारावर मते मागितले असल्याचे आचारसंहिता भंग पथकाच्या निदर्शनास आले. डोन यांच्या भाषणाची समाजमाध्यमांवरील चित्रफीत पाहिल्यानंतर आचारसंहिता भंग पथकाचे प्रमुख उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जावेद डोन यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
‘एमआयएम’ पक्षाकडून धार्मिक आधारावर मते मागण्यात येत असल्याचे आचारसंहिता भंग पथकाच्या निदर्शनास आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आचारसंहिता भंग पथकाने २५ ऑक्टोबर रोजी गोविंदवाडी भागात संध्याकाळी सहा वाजता होणारी ‘एमआयएम’च्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे लेंगरेकर यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीत ‘एमआयएम’ पक्षाने सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. रोहिदासवाडा भागात शकिला खान यांच्या सभेत गुरुवारी जावेद डोन या नेत्याने धार्मिक आधारावर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.