राग, लोभ, वासना अशा विकारांवरून मनुष्याचे नियंत्रण सुटते तेव्हा त्याच्या हातून गुन्हा घडतो. अनेक गुन्ह्यांमागचे कारण किरकोळ असते. पण विकारांच्या आहारी गेलेल्या मानवी मनाला ते क्षुल्लक कारणही प्रचंड मोठे वाटते आणि ते व्यक्तीला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करते. आपला बेत यशस्वी होईल, या कल्पनेने गुन्हेगार निर्धास्त असतो. पण स्वत:च रचलेल्या चक्रव्युहात तो आपोआप फसतो. असाच काहीसा प्रकार भिवंडीजवळील गोवे गावात उघडकीस आला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील गोवे गावातील आठ दिवसांपूर्वीचा प्रसंग. या गावातील एका चाळीत द्रोपदीबाई मधुकर इताडकर राहतात. त्या ५२ वर्षांच्या आहेत. दोन मुले, सून आणि मुलगी असा त्यांचा परिवार. याच चाळीमध्ये मोठा मुलगा आणि सून राहाते, तर त्यांच्यासोबत लहान मुलगा आणि मुलगी राहाते. त्यांचा लहान मुलगा डाईंग कंपनीत काम करतो. १४ डिसेंबरला सायंकाळी द्रोपदीबाई घरामध्ये एकटय़ाच होत्या. सायंकळी ६.३० ची वेळ होती. दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या आणि त्यांनी त्यांच्याकडे पाणी पिण्यासाठी मागितले. त्यामुळे त्या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या. त्यापाठोपाठ ते दोघेही त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी त्यांचे हातपाय कापडी पट्टीने बांधले. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण दोन लाख ६८ हजारांचा ऐवज लुटला. आणि जाताना द्रोपदीबाईंच्या हातात एक चिठ्ठी टाकून पळ काढला.

द्रोपदीबाईंचा मुलगा काही वेळाने घरी आल्यानंतर त्याला हातपाय बांधलेल्या अवस्थेत आपली आई दिसली. त्याने पटकन त्यांची सुटका केली आणि कोन गाव पोलीस ठाणे गाठले. चोरटय़ांनी द्रोपदीबाईंच्या हातात दिलेल्या चिठ्ठीत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींची नावे होती. तसेच या व्यक्तींनी गुन्ह्य़ासाठी सुपारी दिल्याचे चोरटय़ांनी त्यांना सांगितले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोन गाव पोलिसांनी तपास सुरू केला. कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एम. काळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने चाळीतील रहिवाशांकडे चौकशी केली. त्यामध्ये चाळीतील अनेक महिला सायंकाळी घराबाहेरील अंगणात बसल्या होत्या आणि त्यावेळी चाळीतून अनोळखी व्यक्तीला जातानाही कोणीच पाहिले नव्हते. तसेच आरडाओरड झाल्याचा आवाजही कोणालाही ऐकू आला नव्हता. रहिवाशांच्या माहितीमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावली. त्यामुळे पोलिसांनी चोरटय़ांनी द्रोपदीबाईंच्या हातात दिलेल्या चिठ्ठीचा तपास सुरू केला.

या चिठ्ठीतून काही धागेदोरे मिळतात का, याचा पथक शोध घेऊ लागले. चिठ्ठीत नावे असलेल्या कुटुंबाकडे पोलिसांनी चौकशी केली, पण त्यांचा या गुन्ह्य़ात सहभाग नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तसेच घरासमोरील मोकळ्या जागेवरून द्रोपदीबाईंसोबत वाद झाला असल्याची माहिती त्या कुटुंबाकडून पोलिसांना मिळाली. तपासाअंती पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. अखेर पोलिसांनी द्रोपदीबाईंकडे घटनेची सविस्तर चौकशी केली. द्रोपदीबाई आणि त्यांच्या कुटुंबाकडे पोलिसांनी चोरीस गेलेल्या ऐवजाची उलटतपासणी केली. त्यामध्ये कल्याणमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात दागिने गहाण ठेवले होते, भिशीचे पैसे मिळाल्याने ते सोनाराला देऊन त्याच्याकडून दागिने पुन्हा घेतले होते. हे सर्व दागिने घरात ठेवले होते. तसेच भिशीमधील काही रोख रक्कम आणि साठवलेले पैसेही घरात ठेवले होते. हा सर्व ऐवज चोरटय़ांनी चोरून नेला, असे द्रोपदीबाईंनी सांगितले. परंतु त्यांच्या मुलाने वेगळीच माहिती दिली. मावशीने दिलेले एक लाख रुपये घरात ठेवले होते, असे त्याने चौकशीत सांगितले. दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यामध्ये शेजाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचे उघड झाले आणि द्रोपदीबाईंचे बिंग फुटले. जबरी चोरीची खोटी तक्रार दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शेजाऱ्यांना सूडभावनेतून अडकविण्याच्या नादात चोरीचा बनाव आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime happen in gore village in bhiwandi
First published on: 22-12-2015 at 00:27 IST