जप्त केलेल्या रेतीच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी रेती व्यापाऱ्याकडे भिवंडी येथील पोलीस शिपाई संदीप वैद्य व राजेंद्र सोनावणे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी येथील नियंत्रण कक्षात संदीप वैद्य व राजेंद्र सोनावणे हे दोघेही पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रेती मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकास त्यांनी कार्यरत असताना अडविले होते. ट्रकवर कारवाई न करण्यासाठी या दोघांनी रेती-व्यावसायिकाकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी या विषयी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैद्य व सोनावणे यांना लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संजय सादिगले हे अधिक तपास करीत आहेत.

शिसे धातूची चोरी करणारा ट्रक जप्त

ट्रकमधून १५ टन शिसे धातूची वाहतूक करणारा ट्रक शीळडायघर पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी सायंकाळी कल्याण फाटा रोड येथून हा ट्रक जात होता. मेट्रो हॉटेलसमोरील पोलिसांनी ट्रकचालकाकडे कागदपत्रे मागताच त्यांच्याकडे माल वाहतुकीची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. चोरीच्या मालाची वाहतूक केल्याप्रकरणी राजू यादव, मल्लू गौतम, साबीर मोहम्मद नासिर खान यांच्याविरोधात शीळडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालकामगाराचा मृत्यूप्रकरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

दागिने पॉलिश करीत असताना विजेचा धक्का लागल्याने एका सोळा वर्षीय बालकामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात घडली होती. कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा कारखाना आहे. तपन कुमार लक्ष्मीकांत यांचा हा कारखाना असून येथे मूळचा पश्चिम बंगालचा असलेला सुफूर बाबू शेख (१६) हा बालकामगार काम करीत होता. १६ ऑगस्ट रोजी काम करीत असताना विजेचा धक्कालागून तसेच चालू कॉम्प्रेसरच्या पात्याचा डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. बालकामगाराच्या मृत्यूप्रकरणी कारखान्याचे मालक तपन कुमार यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीत चोरी करून कामगार फरार

टेक्स्टाइल कंपनीत दोघा साथीदारांच्या मदतीने कामगारानेच चोरी केली असल्याची घटना घडली आहे. कामगाराच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून कामगार अद्याप फरार आहे. भिवंडी येथील नारायण कम्पांऊंड येथील आराधना टेक्स्टाइल कंपनीत अजय पटेल हा काम करीत होता. २४ जुलैला कंपनीत कुणी नसल्याचा फायदा घेत अजयने त्याचे साथीदार अब्दुल अन्सारी व रियाजुद्दीन खान यांच्या साथीने कंपनीतील ७२ हजार रुपये किमतीचा पॉलिस्टर कॉटन कपडा चोरून नेला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी तपासाअंतर्गत अब्दुल अन्सारी व रियाजुद्दीन खान यांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. अजय अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न

स्टेट बँक  ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून चोरटय़ाने त्यातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारपोली परिसरात जुना आग्रा रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. मंगळवारी पहाटे चोरटय़ाने हे मशीन फोडून त्यातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.